Kolhapur Municipal Election 2026: ईव्हीएम'ची तयारी; नाव, पक्ष. चिन्हांचा केला समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 18:14 IST2026-01-09T18:13:55+5:302026-01-09T18:14:39+5:30
उमेदवार किंवा उमेदवारांचे प्रतिनिधी, निवडणूक निर्णय अधिकारी तसेच अन्य अधिकारी यांच्या समक्ष हे काम केले जात आहे

संग्रहित छाया
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा अत्यंत महत्त्वाचा भाग असलेला इलेक्ट्रिक मतदान यंत्रांचे प्रिपरेशन (नाव, पक्ष, चिन्हांचा समावेश) करण्याचे काम बुधवारपासून सुरू करण्यात आले. उमेदवार किंवा उमेदवारांचे प्रतिनिधी, निवडणूक निर्णय अधिकारी तसेच अन्य अधिकारी यांच्या समक्ष हे काम केले जात आहे. प्रिपरेशनचे काम काल, गुरुवार आणि आज, शुक्रवार असे दोन दिवस सुरू होते.
कोल्हापूर महानगरपालिकेचे एकूण २० प्रभाग असून यापैकी १९ प्रभागांतून प्रत्येकी चार तर प्रभाग क्रमांक २० मधून पाच सदस्य निवडून द्यायचे आहेत. या २० प्रभागांत ५९५ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर किमान दोन तर कमाल तीन मतदार यंत्रे लागणार आहेत. या मतदान यंत्रावर उमेदवारांचे नाव, चिन्ह, पक्ष याची माहिती भरण्याचे काम बुधवारी सकाळपासून सुरू करण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रावर जादा मतदान यंत्रे राखीव ठेवण्यात येणार आहेत.
बुधवारी दुपारी प्रशासक तथा मुख्य निवडणूक अधिकारी के. मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी हॉकी स्टेडियम व दुधाळी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाला भेट देऊन तेथे सुरू असलेल्या मतदान यंत्रे प्रिपरेशनच्या कामाची पाहणी केली. मंजूलक्ष्मी यांनी स्वत: मतदान यंत्रांचे बटण दाबून यंत्रे सक्षम आहेत की नाही याची शहनिशा केली. सात निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडे प्रत्येकी तीन प्रभाग देण्यात आले आहेत. बुधवारी प्रत्येक कार्यालयात एक एक प्रभागाचे प्रिपरेशनचे काम पूर्ण झाले. हे काम आणखी दोन दिवस सुरू राहणार आहे.
प्रशासक मंजूलक्ष्मी यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, मतदान झाल्यानंतर ज्या ठिकाणी मतदान यंत्रे ठेवली जाणार आहेत, त्या ठिकाणीच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आली आहेत. मतदान झाल्यानंतर चार ठिकाणी मतदान यंत्रे चोख सुरक्षा व्यवस्थेत ठेवली जाणार आहेत.
प्राथमिक तपासणीवेळी २५ कंट्रोल युनिट व ४० मतदान यंत्रे नादुरुस्त असल्याचे लक्षात आले होते. आता प्रिपरेशन करतेवेळी काही दोष आढळले तर तीही मतदान यंत्रे बदलली जाणार आहेत. पूर्ण खात्री करूनच मतदान यंत्रे वापरली जातील. मतमोजणीत सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना दि. १२ किंवा १३ जानेवारीला प्रशिक्षण दिले जाणार आहे. एकूण तीस टेबलावर मतमोजणी होणार आहे.