नगराध्यक्षपद महिलासाठी राखीव, शिरोळमध्ये नेतृत्वाचा कस लागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 18:34 IST2025-10-07T18:33:57+5:302025-10-07T18:34:12+5:30
शहरातील राजकारण हे गटातटाभोवतीच फिरत असल्याने सत्तेसाठी कायपण, असेच चित्र पालिका निवडणुकीत पहायला मिळणार

नगराध्यक्षपद महिलासाठी राखीव, शिरोळमध्ये नेतृत्वाचा कस लागणार
शिरोळ : अनुसूचित जाती महिलासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर स्थानिक नेत्यांकडून सक्षम उमेदवाराचा शोध सुरू झाला आहे. आमदार डॉ. अशोकराव माने यांच्या स्नुषा सारिका माने, पंचायत समितीच्या माजी सदस्या योगिता कांबळे, रूपाली राजमाने, शिवानी कांबळे यांची नावे चर्चेत आली आहेत.
नगराध्यक्ष पद महिलासाठी राखीव झाल्यामुळे अनेक इच्छुकांची गोची झाली आहे. मात्र शहरातील राजकारण हे गटातटाभोवतीच फिरत असल्याने सत्तेसाठी कायपण, असेच चित्र पालिका निवडणुकीत पहायला मिळणार आहे. नगरपालिकेच्या मागील पहिल्या निवडणुकीत सर्वसाधारण नगराध्यक्ष आरक्षणामुळे राजकीय चुरस पहायला मिळाली होती. पालिकेचे राजकारण माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील विरूध्द यादव गट असेच सध्यातरी दिसून येते.
येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसबरोबर स्वाभिमानीची भूमिका काय असणार त्यावर देखील आघाड्यांचे चित्र अवलंबून राहणार आहे. तर महायुती व यड्रावकर गटाकडून आमदार डॉ. माने यांच्या स्नुषा यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल मिळणार की गटाचे राजकारण होणार यावर देखील उमेदवाराची निवड अवलंबून आहे.