Kolhapur Municipal Election 2026: मनपा राजकारणालाही घराणेशाहीचा फेर, 'ही' कुटुंब पुन्हा उतरले रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 18:15 IST2026-01-02T18:15:07+5:302026-01-02T18:15:42+5:30
पुन्हा याच घराण्यातील दुसऱ्या, तिसऱ्या पिढीतील सदस्य निवडणूक रिंगणात

Kolhapur Municipal Election 2026: मनपा राजकारणालाही घराणेशाहीचा फेर, 'ही' कुटुंब पुन्हा उतरले रिंगणात
कोल्हापूर : महानगरपालिकेचे राजकारण कोल्हापुरातील काही मोजक्या घराण्याभोवती फिरत आहे. चव्हाण, बुचडे, फरास, शेटे, गवंडी, खेडकर, कवाळे अशी ही घराणी असून, या घराण्यातील सदस्य चार, पाच वेळा निवडून आले आहेत. पुन्हा याच घराण्यातील दुसऱ्या, तिसऱ्या पिढीतील सदस्य निवडणूक रिंगणात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. या घराण्यांनी घरातील पती, पत्नी, मुलगा, सून, असे उमेदवार बदलून दिले आणि विजयही मिळविला.
नाथागोळे जवळील माजी महापौर स्वर्गीय प्रल्हाद चव्हाण स्वत: महापालिकेवर चार वेळा निवडून आले होते. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र सागर चव्हाण निवडून येऊन महापौर झाले. त्यांचे दुसरे पुत्र सचिन चव्हाण एकदा निवडून आले, स्थायी समितीचे सभापती झाले. त्यांची सून जयश्री चव्हाण मागच्या सभागृहात नगरसेविका होत्या. आता पुन्हा त्याच निवडणूक लढवित आहेत.
बाराईमाम येथील माजी महापौर बाबू फरास स्वत: तीन वेळा निवडून आले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन पुत्र आदिल फरास यांनी महापालिकेच्या राजकारणात प्रवेश केला. ते एकदा निवडून आले आणि स्थायी समिती सभापती झाले. बाबू फरास यांच्या पत्नी हसीना फरास निवडून येत पुढे महापौर झाल्या. पुन्हा एकदा हसीना फरास व आदिल फरास आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यास उभे आहेत.
वाचा : निष्ठावानांचा अपक्ष अर्ज; 'आयारामां'ना मात्र एबी फॉर्म; भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी अन् काँग्रेसमध्ये आयात उमेदवार किती..जाणून घ्या
राजारामपुरीतील शिवाजीराव कवाळे १९९० ला नगरसेवक झाले, त्यानंतर त्यांच्या पत्नी कांचन कवाळे, सून कादंबरी कवाळे, मुलगा संदीप कवाळे, असे चौघे नगरसेवक म्हणून निवडून आले. कांचन व कादंबरी या दोघींना महापौर होण्याची संधी मिळाली. संदीप यास स्थायी समिती होता आले. आता दुसरा पुत्र रोहित यास उभे केले आहे.
शुक्रवारपेठेतील माजी महापौर माधवी गवंडी यांचे सासरे स्वर्गीय आनंदराव गवंडी १९८५ ते २००० असे तीनवेळा नगरसेवक झाले. त्यानंतर त्यांचे पुत्र प्रकाश गवंडी हे २०१० मध्ये निवडून आले. माधवी गवंडी या २०१५ ला विजयी झाल्या. त्यांना महापौर होण्याची संधी मिळाली.
गुजरीतील माजी नगरसेवक स्वर्गीय रणजित परमार यांचा स्वत:चा १९९५ मध्ये पराभव झाला, परंतु पुढच्याच निवडणुकीत त्यांनी पत्नी नयना परमार यांचा निवडून आणले. त्यानंतर रणजित निवडून आले. त्यांचे बंधू इश्वर परमार दोन वेळा निवडून आले. आताही तेच निवडणूक लढवित आहेत.
बुचडे कुटुंबीयात पाचवेळा नगरसेवकपद
कसबा बावड्यातील सुभाष बुचडे यांनी दोन वेळा महापालिकेवर प्रतिनिधीत्व केले. त्यांची भावजय मनिषा बुचडे यांना दोन वेळा, तर पत्नी वंदना बुचडे यांना एकवेळ निवडून आणले. वंदना बुचडे महापौर झाल्या, मनिषा या परिवहन सभापती झाल्या होत्या. आता पुन्हा सुभाष बुचडे यांनी अर्ज भरला आहे. शाहूपुरीतील प्रकाश नाईकनवरे, त्यांच्या पत्नी प्रतिभा नाईकनवरे, सून पूजा नाईकनवरे निवडून आल्या. प्रतिभा नाईकनवरेंना महापौर होण्याची संधी मिळाली.
खेडकर कुटुंबियांचा १९९५ पासून वरचष्मा
लक्षतीर्थ वसाहत येथील आनंदराव खेडकर १९९५ मध्ये स्वत: निवडून आलेच शिवाय त्यांनी पत्नी मालती यांना एकदा, सून अनुराधा खेडकर यांना दोन वेळा, तर मुलगा सचिन खेडकर यास निवडून आणले. सचिन उपमहापौर, तर अनुराधा महिला बालकल्याण समिती सभापती झाल्या.