Kolhapur Municipal Election 2026: धुरळा उडवणाऱ्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, अंतिम टप्प्यातील घडामोडींना वेग येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 13:03 IST2026-01-13T13:02:11+5:302026-01-13T13:03:44+5:30
महानगरपालिकेची ही निवडणूक कोणा एका उमेदवाराची नाही तर राजकीय पक्षांच्या अस्तित्वाच्या दृष्टीनेही प्रतिष्ठेची बनली

Kolhapur Municipal Election 2026: धुरळा उडवणाऱ्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, अंतिम टप्प्यातील घडामोडींना वेग येणार
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेवर सत्ता आणण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या प्रचाराचा तोफा आज, मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता शांत होतील. महानगरपालिकेची ही निवडणूक कोणा एका उमेदवाराची नाही तर राजकीय पक्षांच्या अस्तित्वाच्या दृष्टीनेही प्रतिष्ठेची बनली. त्यामुळे प्रचारसभा, मेळावे यातून प्रतिस्पर्धी राजकीय नेत्यांवर झालेल्या आरोप-प्रत्यारोपातून ‘कौन कितने पाणी में’ याचा अंदाजही सुज्ञ मतदारांना आला.
कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक होणार म्हणून गेल्या पाच वर्षांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या उमेदवारांनी निवडणूक जाहीर होताच पायाला भिंगरी बांधून घरोघरी जाऊन प्रचाराला सुरूवात केली. निवडणुकीची घोषणा होताच प्रचाराला जेमतेम २५ दिवसांचा कालावधी मिळणार असल्याने पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याचीही त्यांनी वाट पाहिली नाही.
दि. ३ जानेवारी रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर प्रचाराचा जोर अधिकच वाढला. गल्लोगल्ली, उपनगरातील कॉलनी - कॉलनीतून रोज निघणाऱ्या प्रचार फेऱ्या आणि त्यामागून चालणारे प्रचारक, रोज सकाळी कुठे ना कुठे होणाऱ्या ‘मिसळ पे चर्चा’ चे आयोजन, सायंकाळी होणाऱ्या कोपरा सभा असे निवडणूकमय वातावरण तयार झाले.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार अमल महाडिक, आमदार जयंत आसगांवकर, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांचे जिल्हा अध्यक्ष, शहराध्यक्ष अशा मान्यवरांनी प्रचारात उडी घेत राजकीय टोलेबाजी करत निवडणूक मैदान ढवळून टाकले.
ही निवडणूक महायुती विरुद्ध आमदार सतेज पाटील अशी होत आहे. अनेक मान्यवर एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आमदार पाटील एकटे असल्याने निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत मतदारात उत्सुकता आहे. उमेदवारी देण्यावरून निर्माण झालेली नाराजी दूर करण्याच्या प्रयत्नात महायुतीचे नेते असताना आमदार सतेज पाटील यांनी प्रचाराला सुरूवात केली.
कधी सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला तर कधी चहा-मिसळ पार्टीत सहभागी होऊन मतदारांशी चर्चा केली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला तर केएमटी बसमधून प्रवास करीत प्रवाशांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या प्रचाराचा हा फंडा मात्र महायुतीच्या दृष्टीने टीकेचा विषय केला गेला. मंत्री मुश्रीफ यांनी तर रोजच केएमटीतून प्रवास करा, अशा शुभेच्छा दिल्या.
प्रचारसभातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. प्रचाराच्या दरम्यान खराब रस्ते, थेट पाइपलाइन, शहराचा विकास या गोष्टी नेत्यांच्या भाषणात अग्रस्थानी राहिल्या. थेट पाइपलाइनमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महायुतीच्या नेत्यांनी करताच आमदार पाटील यांनीही सडेतोड उत्तर देताना या योजनेला विलंब कोणी केली, योजनेत अडथळे कोणी निर्माण केले असे प्रश्न उपस्थित केले. पंधरा वर्षात काँग्रेसने काहीच केले नाही असे ठासून सांगणाऱ्या महायुतीला पाच वर्षात तुमची सत्ता होती तर का विकास केला नाही, असा सवाल काँग्रेसने विचारला.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही प्रचारात सहभागी
महानगरपालिकेच्या प्रचारात स्थानिक मंत्री, आमदार, खासदार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही भाग घेतला. फडणवीस-शिंदे यांचे धावते दौरे युतीच्या नेत्यांना ऊर्जा देऊन गेले.
मतदान स्लीप वाटप
मतदारांना मतदान स्लीप घरोघरी वाटण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी ६०० हून अधिक बीएलओ काम करत आहेत. यावेळी मतदानासाठी मतदारांच्या घरापासून एक ते दोन किलोमीटर अंतरावर काही केंद्र आहेत.
मतमोजणीची तयारी
मतदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून शासकीय गोदाम रमणमळा, व्ही. टी. पाटील सभागृह, गांधी मैदान पॅव्हेलियन, दुधाळी पॅव्हेलियन अशा चार ठिकाणी मतमोजणी होणार आहे.