Kolhapur: राधानगरीतील हत्तीमहलचा कायापालट होणार, १५ कोटींचा आराखडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 18:26 IST2025-03-05T18:23:51+5:302025-03-05T18:26:25+5:30
गौरव सांगावकर राधानगरी : येथील राजर्षी शाहू महाराजांचा ऐतिहासिक ठेवा अनेक वर्षे उपेक्षित आणि दुर्लक्षित आहे. याच हत्तीमहलच्या मोडकळीस ...

लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या ''हत्तीमहलच्या उरल्या केवळ भिंती'' या बातमीची दखल. आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणे गरजेचे
गौरव सांगावकर
राधानगरी : येथील राजर्षी शाहू महाराजांचा ऐतिहासिक ठेवा अनेक वर्षे उपेक्षित आणि दुर्लक्षित आहे. याच हत्तीमहलच्या मोडकळीस आलेल्या भिंतींना अखेर बळ मिळणार आहे. हत्तीमहलचा कायापालट होणार असून, परिसरात निसर्ग माहिती केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे.
अनेक जिल्ह्यातून पर्यटक दाजीपूर, राधानगरी, हत्तीमहल येथे भेट देत असतात. पण, शंभर वर्षांपूर्वीची ही वास्तू पहावयास येणाऱ्या पर्यटकांच्या पदरी मात्र निराशा पडते. कारण ''हत्तीमहल'' हा ऐतिहासिक ठेवा झाडा झुडपांनी वेढलेला आहे. अनेक वेळा निधी मंजूर झाले, पण झाडाझुडपांची स्वच्छता या व्यतिरिक्त महलाच्या पदरी काहीही पडलेले नाही. पण, हाच ठेवा आता मोकळा श्वास घेण्याच्या मार्गावर आहे. यासाठी वन विभागाकडून राधानगरी येथील हत्तीमहलसाठी १५ कोटी निधी खर्चून निसर्ग माहिती केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे.
या माहिती केंद्रामध्ये अभयारण्यातील विविध वनस्पती, सस्तन प्राणी, पक्षी कीटक, यांची माहिती असणार आहे. याचबरोबर या केंद्रात निरीक्षण मनोरे, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, गेस्ट हाऊस, लाकडी घरे, डायनिंग हॉल, फिरण्यासाठी दगडी रस्ता, कारंजे, प्राण्यांची दगडी शिल्प, ग्रंथालय, पार्किंग तसेच तिकीट काउंटर असणार आहे.
राधानगरी पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच राजर्षी शाहूंचे ऐतिहासिक वारसा स्थळ जतन करण्याच्या दृष्टीने पर्यटन आराखडा तयार केला असून, शासन स्तरावर लवकरच निधीची तरतूद होईल. - सुहास पाटील, वनक्षेत्रपाल, राधानगरी.