Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजी महापालिका निवडणुकीत सर्वच प्रभागांत चुरस, 'या'ठिकाणी महायुतीतच कुस्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 16:39 IST2026-01-02T16:35:28+5:302026-01-02T16:39:05+5:30
'या' प्रभाग महायुतीतच कुस्ती

Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजी महापालिका निवडणुकीत सर्वच प्रभागांत चुरस, 'या'ठिकाणी महायुतीतच कुस्ती
इचलकरंजी : येथील महापालिकेच्या निवडणुकीसाठी जवळपास सर्वच प्रभागांत चुरस असून, आपल्या प्रभागात घटक पक्षांतील प्रतिस्पर्धी किंवा बेरजेच्या राजकारणात अडथळा ठरणारा अपक्ष यांना माघार घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत खलबत्ते सुरू होते. माघारीसाठी आज, शुक्रवारचे चार तासच शिल्लक आहेत. उमेदवारांसह पक्षश्रेष्ठी आणि भागातील जाणकार मध्यस्थ यांच्यामार्फत या तडजोडीच्या बैठका सुरू आहेत. त्यामध्ये कोणाला यश आले, हे माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे.
शहरातील बहुतांश प्रभागांत रंगतदार लढती होणार आहेत. त्यातील काही प्रभागांत भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी यांचे उमेदवार पक्षाच्या अधिकृत चिन्हावर मैत्रीपूर्ण म्हणून उभारले आहेत. प्रामुख्याने त्यातील शक्य त्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी मनधरणी आणि तडजोडीचे राजकारण सुरू आहे. दिवसभर चर्चेच्या अनेक फेºया झाल्या. परंतु त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत पुन्हा खलबत्ते सुरूच होते.
काही प्रभागांत मैत्रीपूर्णमध्ये प्रबळ उमेदवार असल्यामुळे तेथे महायुतीच्या उमेदवाराला अडचण होऊ शकते. त्या ठिकाणांच्या उमेदवारांना माघारीसाठी पक्षश्रेष्ठींमार्फत जोडण्या लावण्याचे काम सुरू आहे. तडजोडी न झाल्यास मैत्रीपूर्ण लढतींचे नाव दिले असले तरी तेथे काटे की टक्कर होणार आहे. महायुतीच्या बेरजेच्या गणितानुसार या मैत्रीपूर्ण कुस्तीतून जो उमेदवार विजयी होईल, तो महायुतीचा, अशी भूमिका दिसत आहे. याला कोणकोणत्या प्रभागांत खो बसेल, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.
प्रभाग क्रमांक १५ मध्ये महायुतीतच कुस्ती
प्रभाग क्रमांक १५ मध्ये महायुतीतील भाजप आणि शिंदेसेना यांच्यात चांगलीच कुस्ती लागली आहे. माघारी आणि तडजोडीसाठीचे प्रयत्न बाजूलाच राहिले असून, शिंदेसेनेने अंजली मदन जाधव या अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केले. त्यामुळे प्रभागातील चारही उमेदवारांचे पॅनेल शिंदेसेना म्हणून लढणार आहे. त्याचबरोबर या प्रभागात भाजपचे ४, शिव-शाहू आघाडीचे ४ आणि अपक्ष यांच्यात बहुरंगी लढत होणार आहे.
दोन ठिकाणी बिनविरोधसाठी प्रयत्न
प्रतिस्पर्धी उमेदवारांना माघार घेण्यासाठी तयार करून आपली बिनविरोध निवड व्हावी, यासाठी शहरातील जवाहरनगर, विक्रमनगर आणि गावभाग या परिसरातील दोन प्रभागांत प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच्या तडजोडी मध्यस्थांमार्फत रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. याबाबतची चर्चा शहरात रंगली होती. प्रत्यक्षात माघारीनंतरच त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.