Kolhapur: शाहूवाडी तहसीलदारांवर लाचप्रकरणी कारवाई करा, आमदार प्रकाश सुर्वे यांची विधानसभेत लक्षवेधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 18:00 IST2025-03-26T17:59:56+5:302025-03-26T18:00:29+5:30
जिल्ह्यातील एकाही आमदाराचे लक्ष नाही

Kolhapur: शाहूवाडी तहसीलदारांवर लाचप्रकरणी कारवाई करा, आमदार प्रकाश सुर्वे यांची विधानसभेत लक्षवेधी
कोल्हापूर : शाहूवाडी तहसील कार्यालयातील लाचखोरीवर मुंबईचे शिंदेसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मंगळवारी विधानसभेत लक्षवेधी ( क्रमांक २५३० मार्च २०२५) चर्चेची मागणी केली. तहसीलदार रामलिंग चव्हाण (मूळ रा. तुळशी ता.माढा., जि.सोलापूर) यांच्या नावे पाच लाखांची लाच स्वीकारताना पंटर सुरेश खोत याला अटक करण्यात आली. मात्र खोत याने ज्यांच्यासाठी लाचेची मागणी केली. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
यामुळे तहसीलदार चव्हाण यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे. यासंबंधी शासनाने केलेली आणि करावयाच्या कारवाईसंबंधीची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आमदार सुर्वे यांनी केली. अध्यक्षांनी ती मान्य केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या विभागीय आयुक्तांना यासंबंधीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल देण्याचा आदेश महसूल विभागाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांनी दिला आहे.
शाहूवाडी तालुक्यातील येळाणे येथील तक्रारदाराच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील फेरफारमध्ये खाडाखोड करून चुकीच्या गटनंबरची नोंद केली. ती दुरूस्त करावी म्हणून तक्रारदाराने ६ फेब्रुवारी २०२३ रोजी तहसील कार्यालयात अर्ज केला होता. यासाठी ते वारंवार तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्याकडे जावून पाठपुरावा करत होते पण त्यांच्या कामात दिरंगाई होत राहिली.
शाहूवाडी तहसील कार्यालयात प्रलंबित असलेले सावे येथील गटनंबर ६१६ बाबतचे काम तहसीलदार चव्हाण यांच्याकडून पूर्ण करून देतो, त्यासाठी चव्हाण यांना देण्यासाठी पाच लाखांची मागणी पंटर सुरेश खोत यांनी तक्रारदार यांच्याकडून केली. ती स्वीकारताना खोत यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने १८ मार्च २०२५ रोजी पकडले. पण तहसीलदार चव्हाण यांच्यावर कारवाई झाली नाही, याकडेच आमदार सुर्वे यांनी लक्ष वेधले.
आमदार सुर्वे यांच्या लक्षवेधीत म्हटले आहे, तक्रारदार यांचे मामेभाऊ यांच्यासह सहहिस्सेदार यांच्या अर्जावर सुनावणी सुरू होती. त्यावेळी शाहूवाडी तहसीलदारांचे दलाल सुरेश खोत यांनी तक्रारदार यांची भेट घेऊन तुमचे प्रलंबित काम पूर्ण करून देतो असे सांगून ५ लाखांची मागणी केली. तक्रारदारांकडून पाच लाखांची लाच घेताना पंटर खोत यांना अटक केली. या प्रकरणात तहसीलदार चव्हाण यांच्यावरही कारवाई करावी.
जिल्ह्यातील एकाही आमदाराचे लक्ष नाही
शाहूवाडी तहसीलमधील पाच लाखांचे प्रकरण जिल्ह्यासह राज्यात गाजत आहे. लाचखोरीचा सर्वाधिक त्रास शाहूवाडी तालुक्यातील सामान्य जनतेला होत आहे. यामुळे या प्रकरणाकडे शाहूवाडीचे आमदार विनय कोरे यांच्यासह जिल्ह्यातील इतर आमदारांनी लक्ष वेधणे अपेक्षित होते. पण, जिल्ह्यातील एकाही आमदाराने प्रश्न उपस्थित केलेला नाही. उलट मुंबईतील मागाठणे मतदारसंघातील प्रकाश सुर्वे यांनी याकडे लक्ष वेधून शाहूवाडी महसूलमधील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणला.
अनेक एजंट नेमून वसुली..
शाहूवाडी तहसीलमध्ये एजंटतर्फे वसुली केली जात आहे. सामान्य जनता अशा तहसीलदारांच्या कारभाराने त्रस्त आहे, चव्हाण यांनी खोत यासारखे अनेक एजंट नेमून वसुली सुरू असल्याचे लक्षवेधी सूचनेच्या प्रस्तावात म्हटले आहे.