Kolhapur: बाबासाहेब कुपेकर जाऊन १३ वर्षे उलटली, त्यांच्या कारकीर्दीत मंजुरी मिळालेले काही प्रकल्प रखडलेलेच; कधी पूर्ण होणार कामे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 19:19 IST2025-09-26T19:16:31+5:302025-09-26T19:19:02+5:30
राम मगदूम गडहिंग्लज : चंदगड विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार बाबासाहेब कुपेकर यांनी गडहिंग्लजसह चंदगड व आजरा तालुक्यांच्या सर्वांगीण विकासाचा ...

Kolhapur: बाबासाहेब कुपेकर जाऊन १३ वर्षे उलटली, त्यांच्या कारकीर्दीत मंजुरी मिळालेले काही प्रकल्प रखडलेलेच; कधी पूर्ण होणार कामे?
राम मगदूम
गडहिंग्लज : चंदगड विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार बाबासाहेब कुपेकर यांनी गडहिंग्लजसह चंदगड व आजरा तालुक्यांच्या सर्वांगीण विकासाचा पाया घातला. त्यांचे देहावसान होऊन तब्बल १३ वर्षे उलटली तरीही त्यांच्या कारकीर्दीत मंजुरी मिळालेले काही प्रकल्प अजूनही रखडलेलेच आहेत. त्यामुळे हे प्रकल्प कधी मार्गी लागणार, असा सवाल बाबाप्रेमींसह गडहिंग्लज विभागातील जनता विचारत आहे.
५०० लोकवस्तीच्या इनामदार घराण्यात जन्माला येऊनही सर्वसामान्य जनतेशी जुळलेली नाळ त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत कायम राहिली. कानडेवाडीच्या सरपंचपदापासून विधानसभेच्या अध्यक्षपदापर्यंत त्यांनी मजल मारली. मंत्र्यापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि शिपायापासून सचिवापर्यंतच्या जिव्हाळ्यामुळे अनेक प्रश्न त्यांनी लीलया मार्गी लावले. परंतु, त्यांच्या आकस्मिक निधनाने त्यांनी मंजुरी मिळवलेले महत्त्वाचे प्रकल्प आहे तिथेच आहेत.
गडहिंग्लज, चंदगड तालुका क्रीडासंकुल
२०१० मध्ये एक कोटीच्या निधीसह गडहिंग्लज, चंदगड व आजरा या तालुक्यांच्या क्रीडासंकुलांना मंजुरी मिळाली. उच्च न्यायालयापर्यंत जाऊन त्यांनी गडहिंग्लजच्या क्रीडासंकुलासाठी १० एकर जागाही मिळवली. दरम्यान, सुमारे तीन कोटींचा निधी मिळूनही क्रीडासंकुलाच्या कामाचा अद्याप श्रीगणेशा झालेला नाही. जिल्हा क्रीडाधिकारी व तालुका क्रीडा समिती यांच्यातील समन्वयाअभावी चंदगड तालुका क्रीडासंकुलाचे बांधकाम १५ वर्षे अर्धवट स्थितीत आहे.
चंदगडचे ट्रामा केअर सेंटर
२०११ मध्ये बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर होणाऱ्या अपघातातील जखमींच्या उपचारासाठी ५० खाटांच्या रुग्णालयासह ट्रामा केअर सेंटरला मंजुरी मिळवली. जागेअभावी रखडलेल्या या सेंटरसाठी आमदार राजेश पाटील यांनी शिनोळी औद्योगिक वसाहतीत जागा मिळवली. परंतु, तांत्रिक कारणामुळे अद्याप बांधकाम सुरू नाही.
२००५ मध्ये गडहिंग्लजच्या ‘एमआयडीसी’त ग्रेमॅक प्रकल्प आणून तरुणांना रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला. परंतु, निर्धारित वेळेत प्रकल्प न उभारल्यामुळे शासनाने ‘ग्रेमॅक’ची जागा काढून घेतली. त्यानंतर नवे उद्योग येण्यास विलंब झाल्याने गडहिंग्लजचे औद्योगिकरण रखडले.
मध्यवर्ती प्रशासकीय इमारत
गडहिंग्लज शहरातील सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीस मंजुरी आणली. परंतु, जागेअभावी या इमारतीचे कामही अद्याप रखडलेलेच आहे.
‘गडहिंग्लज’चा रिंगरोड
२००५ मध्ये ५० लाखांचा निधी आणून गडहिंग्लजच्या रिंगरोडच्या कामाचा प्रारंभ केला. परंतु, न्यायालयीन वाद व निधीअभावी हे काम अजूनही मार्गी लागलेले नाही.
‘बाबां’ची ठळक कामगिरी
चित्री, उचंगी, सर्फनाला व आंबेओहोळ या प्रकल्पांची मंजुरी कुपेकरांनीच मिळवली. त्यामुळे आजरा व गडहिंग्लज तालुक्यांतील शेती व पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुकर झाला. प्रकल्पग्रस्तांच्या शंभर टक्के पुनर्वसनासह चित्री प्रकल्प वेळेत पूर्ण केला.
गडहिंग्लजमध्ये उभारलेले १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय ५ तालुक्यांसह सीमाभागातील गोरगरिबांना वरदान ठरले आहे.
राज्य वीज मंडळाला भाड्याने दिलेली भडगाव रोडवरील जागा नगरपालिकेला परत मिळवून दिली. याठिकाणी भाजीमंडई बांधण्यात आलेली आहे.
तिलारी घाट सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून घेतला, पारगड-आंबोली रस्त्याचे काम मार्गी लावले.