Kolhapur Municipal Election 2026: हलगीचा कडकडाट, शक्तिप्रदर्शनाने जत्रेचे स्वरुप; १७० अर्ज दाखल, आज शेवटचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 12:24 IST2025-12-30T12:23:44+5:302025-12-30T12:24:19+5:30
प्राथमिक छाननीलाच वेळ, कार्यकर्त्यांच्या गर्दीने रस्ते फुलले

छाया-नसीर अत्तार
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी शहरातील ८१ प्रभागांसाठी १७० अर्ज दाखल झाले. आतापर्यंत १९९ अर्ज दाखल झाले आहेत. शहरातील सर्वच्या सर्व सात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मोठ्या गर्दीसह शक्तिप्रदर्शन करत त्यांचे अर्ज भरले. आज, मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक येत्या १५ जानेवारीला होत असून राजकीय पक्षाची उमेदवारी मिळविण्यात झालेली प्रचंड चढाओढ पाहता आणि नेतेमंडळींकडून राजकीय रणनीती आखताना घेतली जात असलेली खबरदारी पाहता ही निवडणूक कमालीची चुरशीची होणार, हे उघड आहे.
अर्ज दाखल करण्याचा आज, मंगळवारी शेवटचा दिवस असतानाही महायुतीतील घटक पक्षांनी त्यांच्या उमेदवारांना ‘एबी फॉर्म’ दिले नसल्याने या पक्षाकडून इच्छुक असणाऱ्या सर्वच उमेदवारांनी एक अपक्ष व एक पक्षाचा उमेदवार म्हणून अर्ज भरले. काहींनी दोन, काहींनी तीन, तर काहींना चार अर्ज दाखल केले. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), आप, वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या उमेदवारांना ‘एबी फॉर्म’ दिल्याने त्यासह त्यांनी अर्ज भरण्यास सुरवात केली. आतापर्यंत २१८५ अर्जांची विक्री झाली आहे.
दिवसभर सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये फुलून गेली. पक्षाचे स्कार्प, टोप्या, छातीवर बिल्ले लावलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने अर्ज भरण्यास गेले होते. गटागटाने कार्यकर्ते आल्याचे पाहायला मिळाले. काही ठिकाणी तर सवाद्य मिरवणुकीने जाऊन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती.
सोमवारी दुपारी एकनंतर अनेक उमेदवार कार्यालयात पोहोचल्यानंतर तेथे गर्दी झाली. त्यामुळे प्राथमिक छाननीसह अर्ज सादर करण्यास विलंब होत होता. व्ही. टी. पाटील सभागृहात तर दुपारी तीनची वेळ संपल्यानंतरही पुढे दोन अडीच तास ही प्रक्रिया सुरू होती. महासैनिक दरबार हॉल, यशवंतराव चव्हाण हॉल दसरा चौक, ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथील कार्यालयांतही अशीच परिस्थिती होती. दुपारी तीन वाजेपर्यंत कार्यालयात पोहोचलेल्या उमेदवारांना टोकन देऊन नंतर जशी प्रक्रिया करून पुढे येतील तसे अर्ज दाखल होत होते.
प्राथमिक छाननीलाच वेळ
अर्ज दाखल करतेवेळी आधी उमेदवारांनी भरलेला अर्ज, त्यासोबत जोडलेली कागदपत्रे योग्य आहेत की नाही. काही कागदपत्रे जोडायची राहिली आहेत का, याची छाननी केली जाते. त्यासाठी प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष निर्माण केले आहेत. या छाननीला वेळ लागत असल्याने अर्ज दाखल करून घेण्यास वेळ लागत आहे.
कडकडाट हलगीचा...बावड्याने अनुभवला माहोल जत्रेचा
कोल्हापूर : हलगीचा कडकडाट, फटाक्यांची आतषबाजी, घोषणा अशा आवेषपूर्ण वातावरणाचा माहोल सोमवारी महासैनिक दरबार हॉल परिसराने अनुभवला. निमित्त होते महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचे. सोमवारी एका दिवसांत प्रभाग क्रमांक १, २ व ५ मधील १३ उमेदवारांनी मुहूर्त साधत उमेदवारी अर्ज दाखल केले. काँग्रेसकडून माजी महापौर स्वाती यवलुजे, माजी उपमहापौर अर्जुन माने, विनायक कारंडे यांनी अर्ज दाखल केले. हलगी, घुमक्याच्या निनादात या पदयात्रा निघाल्याने कसबा बावडा, लाईन बाजार परिसराला अक्षरश यात्रेचे स्वरूप आले होते.
वकिलांचीही गर्दी
उमेदवारी अर्जात चुका राहू नये यासाठी उमेदवार वकिलांना घेऊन अर्ज भरण्यासाठी जात होते. विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराकडे दोन दोन वकिलांची टीम होती. काही पक्षानेही वकील नेमले आहेत. त्यामुळे अर्ज भरण्यापूर्वी हे वकील दोन-तीन वेळा अर्जाची तपासणी करत होते.
वास्कर, मुतगी, केसरकर, रूपाराणी निकम यांचे अर्ज
कोल्हापूर : हॉकी स्टेडियमच्या निवडणूक कार्यालयात एकूण ३७ जणांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. वॉर्ड क्रमांक १६ मधून भाजपचे विलास वास्कर, मुरलीधर जाधव, काँग्रेसचे उमेश पोवार, धनश्री कोरवी यांनी प्रामुख्याने अर्ज दाखल केले. प्रभाग क्रमांक १७ मधून भाजपकडून रवींद्र मुतगी आणि काँग्रेसकडून प्रवीण केसरकर यांनी अर्ज दाखल केले. वार्ड क्रमांक १८ मधून प्रामुख्याने भाजपकडून स्वाती कदम, रूपाराणी निकम आणि काँग्रेसकडून सर्जेराव साळोखे यांनी अर्ज दाखल केले आहेत. प्रमुख दावेदारांच्या घरातील तीन, चार जणांनी आपले अर्ज दाखल करून ठेवले आहेत.
नाईकनवरे, परमार, समर्थसह आजरेकरांनी दाखल केला अर्ज
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी शहाजी कॉलेज येथील निवडणूक कार्यालयाकडे सोमवारी एकाच दिवशी प्रभाग क्रमांक १२,१३,१४ मधून ३३ जणांनी अर्ज दाखल केले. यामध्ये माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, ईश्वर परमार, अमर समर्थ यांच्यासह आस्कीन आजरेकर, पूजा शेटे, प्रेमा डवरी आदींचा समावेश आहे. आतापर्यंत तिन्ही प्रभागातील १२ जागांसाठी ३८ जणांनी अर्ज दाखल केले.