Kolhapur Municipal Election 2026: उमेदवार निवडीच्या घडामोडींचा केंद्रबिंदू ठरले शिरोली; तीन महापालिकांमधील नवी नावं यादीत शिरली!
By समीर देशपांडे | Updated: December 29, 2025 13:53 IST2025-12-29T13:49:39+5:302025-12-29T13:53:26+5:30
कोल्हापूर, इचलकरंजी, सांगलीच्या जागावाटपांवर चर्चा, अनेक फेऱ्यानंतर एकेक गुंता सुटत गेला

छाया-आदित्य वेल्हाळ
समीर देशपांडे
कोल्हापूर: महायुतीच्याकोल्हापूर, इचलकरंजी आणि सांगली महापालिका उमेदवार निवडीच्या घडामोडींचा केंद्रबिंदू रविवारी शिरोली परिसर बनला. महायुतीच्या सर्वच नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी एक एक गुंता सुटत गेल्याचे यावेळी पाहावयास मिळाले. सकाळी दहा ते सायंकाळी सहा असे तब्बल आठ तास या ठिकाणी या तीनही महापालिकांच्या जागा वाटपासाठी वेगवेगळ्या बैठका झाल्या.
भाजप नेते, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना या तीनही महापालिकांचा विषय संपवून लवकरात लवकर पुण्याला जायचे असल्याने आणि कोल्हापुरात बैठक घेतली की तीनही पक्षाचे कार्यकर्ते गर्दी करत असल्यामुळे पुलाची शिरोली येथील महाडिक यांच्या पंपावरील कार्यालयात ही बैठक घेण्यात आली. या ठिकाणी मंत्री पाटील यांनी आधीच निरोप दिल्यानुसार माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, आमदार राहुल आवाडे हे या ठिकाणी उपस्थित होते. या ठिकाणी इचलकरंजीसाठी भाजप आणि शिंदेसेनेतील जागा वाटप निश्चित करण्यात आले आणि इचलकरंजीकर निघून गेले. या चर्चेवेळी राष्ट्रवादी अजित पवारचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर हेदेखील उपस्थित होते.
दुपारी १ च्या सुमारास वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हे जिल्हा बँकेतून निघून शिरोलीच्या पंपावर दाखल झाले. त्यावेळी मंत्री पाटील, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, माजी मंत्री सुरेश खाडे, शेखर इनामदार, संघटनमंत्री मकरंद देशपांडे, जनसुराज्यचे समित कदम यांच्यात सांगलीबाबत चर्चा झाली. ही चर्चा संपवून सांगलीची मंडळी निघून गेली.
यानंतर एका दालनामध्ये मंत्री पाटील आणि मुश्रीफ यांच्यात चर्चेची फेरी सुरू झाली. यावेळी भाजपचे प्रभारी आमदार अतुल भोसले, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास आदी उपस्थित होते.
उपांत्य फेरीला सुरुवात
सांगलीची चर्चा झाल्या झाल्या खासदार धनंजय महाडिक यांना निरोप देण्यात आला आणि त्यानंतर महाडिक यांच्यासह शिंदेसेनेचे नेते पंपावर दाखल झाले. यामध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील, सत्यजित कदम, शारंगधर देशमुख, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अमित हुक्केरीकर यांचा समावेश होता. दुसऱ्या मीटिंगहॉलमध्ये हे सर्वजण बसले आणि नमस्कार झाले आणि चर्चेला सुरुवात झाली.
कोरे आले बघा
सांगलीची चर्चा झाल्यानंतर मंत्री पाटील यांनी समित कदम यांना सूचना करून विनय कोरे यांना पाचारण केले. त्यानुसार अर्ध्या तासात कोरे हेदेखील पंपावर आले. त्यांना बैठकीच्या ठिकाणी प्रवेश करताच चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘कोल्हापूर महापालिका चालवणारे कोरे आले बघा’ आणि बैठकीच्या ठिकाणी हशा पिकला. कोरेदेखील कोल्हापूर महापालिकेच्या जागा वाटपाच्या चर्चेत सहभागी झाले. परंतु, त्यांना किती जागा द्यायच्या ठरल्या हे समजू शकले नाही.
अन् चंद्रकांत पाटील पुण्याला रवाना
मंत्री पाटील यांनी पहिल्या प्रभागापासून नेमकी अडचण कुठे कुठे आहे असे विचारत सर्व प्रभागांचा आढावा घेतला. काही ठिकाणी आवश्यक सूचना दिल्यात. मुश्रीफ आणि क्षीरसागर हेदेखील चर्चेत काही गोष्टी मांडत होते. बाकीचे पदाधिकारीही त्यांना असेल ती माहिती देत होते. तेथील प्रत्येक पक्षाची स्थिती, उमेदवाराची ताकद या सगळ्याबाबत साधकबाधक चर्चा होऊन फॉर्म्युल्याच्या जवळपास आल्यानंतर सूचना देऊन पाटील साडे तीनच्या सुमारास पुण्याला रवाना झाले.
पुन्हा काथ्याकुट
यानंतर या सर्व नेतेमंडळींमध्ये अडीच तास एका एका जागेवर काथ्याकुट करण्यात आला. एकाही कमी ताकतीच्या उमेदवारामुळे महायुतीला फटका बसू नये यासाठी सर्व निकषांची खातरजमा करत जो तो नेता आपल्या उमेदवारांची नावे सुचवत होता. परंतु, लगेच दुसरा नेता तेथील वास्तव सांगून पर्याय सुचवत होता. त्यामुळे या सर्वांना जागा वाटपाच्या अंतिम रचनेसाठी एकमत करण्याच्या जवळ येण्यासाठी अडीच तास लागले आणि संध्याकाळी सहा वाजता दोन, तीन जागांचा तिढा घेऊन नेते तिथून उठले. शेवटच्या टप्प्यात खासदार धैर्यशील माने हेदेखील या ठिकाणी उपस्थित झाले.