Municipal Election 2026: कोल्हापूर, इचलकरंजीत बुधवारपासून तीन दिवस दारू विक्री बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 13:08 IST2026-01-12T13:07:51+5:302026-01-12T13:08:39+5:30
छुप्या विक्रीवर करडी नजर, खरेदीसाठी गर्दी

संग्रहित छाया
कोल्हापूर : महापालिका निवडणुकांमुळे कोल्हापूर आणि इचलकरंजी परिसरात १४ ते १६ जानेवारीच्या दरम्यान तीन दिवस दारू विक्री व परमिटरूम बीअरबार बंद राहणार आहेत. या काळात दारूची छुपी विक्री होऊ नये, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलिसांची तस्करी आणि विक्रीवर करडी नजर राहणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी दिली.
निवडणूक काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून दारूचा वापर होऊ शकतो. असे प्रकार टाळण्यासाठी कोल्हापूर आणि इचलकरंजी येथील देशी दारू विक्रीची दुकाने, वाइन शॉपी, बीअर शॉपी आणि परमिटरूम बीअर बार सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. बुधवार ते शुक्रवारी रात्रीपर्यंत दारू विक्री बंद ठेवण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाने विक्रेत्यांना दिले आहेत.
या काळात दारूची छुपी विक्री होऊ शकते. हा धोका लक्षात घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांकडून संशयितांच्या हालचालींवर नजर राहणार आहे. पोलिसांकडूनही दारू तस्करीतील सराईतांवर कारवाया केल्या जाणार आहेत. विक्रीस बंदी असताना कोणीही आदेशाचे उल्लंघन करून दारू विक्री करू नये, अन्यथा दोषींवर कारवाई केली जाईल, असा इशारा अधीक्षक नरवणे यांनी दिली आहे.
खरेदीसाठी गर्दी
सलग तीन दिवस दारू विक्री बंद राहणार असल्याने, कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरातील वाइन शॉपींमध्ये खरेदीसाठी प्रचंड गर्दी आहे. यात राजकीय कार्यकर्ते, उमेदवारांच्या समर्थकांचा समावेश आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे. बंद काळात याच दारूचा वापर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.