कोल्हापूर महापालिकेसाठी उद्या आरक्षण सोडत, लढतीचे चित्र होणार स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 19:02 IST2025-11-10T19:01:35+5:302025-11-10T19:02:34+5:30
Municipal Election: ११ प्रभांगावर अनुसूचित जाती, २० प्रभागांवर इतर मागास प्रवर्गाचे थेट आरक्षण

कोल्हापूर महापालिकेसाठी उद्या आरक्षण सोडत, लढतीचे चित्र होणार स्पष्ट
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या, मंगळवारी होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. सोडतीवेळी बहुतांशी आरक्षणे थेट दिली जाणार असली तरीही त्याबाबतची कमालाची उत्सुकता आहे.
शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात ही आरक्षण सोडत जाहीर केली जाणार आहे. ही सोडत प्रक्रिया नागरिकांना प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहता येईल. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनानुसार या प्रक्रियेतील बरीच आरक्षणे ही थेट दिली जाणार आहेत. त्यामुळे दीड तासात ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्वच प्रभागातील लढतीचे चित्र स्पष्ट होईल.
अनुसुचित जाती प्रवर्गातील आरक्षण असे असेल
महानगरपालिकेच्या ८१ सदस्य असणाऱ्या सभागृहात लोकसंख्येच्या निकषावर अनुसुचित जाती प्रवर्गासाठी ११ प्रभागांवर थेट आरक्षण असेल. या अकरा प्रभागामधील सहा जागा याच प्रवर्गातील महिलांसाठी असतील आणि त्या लॉटरी पध्दतीने निश्चित केल्या जातील.
क्रमांक / वॉर्ड क्रमांक / अ. जा. संख्या
१. वॉर्ड क्र. ४ / ९३७६
२. वॉर्ड क्र. १८ / ६८७७
३. वॉर्ड क्र. १७ / ५८८६
४. वॉर्ड क्र. १३ / ५२४६
५. वॉर्ड क्र. १५ / ४८७३
६. वॉर्ड क्र. १ / ४८३७
७. वॉर्ड क्र. ११ / ४१०३
८. वॉर्ड क्र. १९ / ४०१९
९. वॉर्ड क्र.२ / २८९५
१०. वॉर्ड क्र.६ / २८३७
११. वॉर्ड क्र. २० / ३४९७
इतर मागास प्रवर्गाचे आरक्षण असे असेल
इतर मागास प्रवर्गातून २१ सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यामुळे याही जागांचे आरक्षण थेट दिले जाणार आहे. महापालिकेसाठी एकूण २० प्रभाग आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागात एक जागा थेट इतर मागास प्रवर्गातील सदस्यासाठी आरक्षीत केली जाईल. एक सदस्याची जी जागा राहिल ती प्रभाग क्रमांक २० मध्ये आरक्षीत ठेवली जाणार आहे. पाच सदस्य असणाऱ्या प्रभागात जास्तीत जास्त दोन इतर मागास प्रवर्गाचे सदस्य असावेत असा राज्य निवडणूक आयोगाची नियम आहे. २१ जागांवर थेट आरक्षण दिल्यानंतर त्यातून महिलांसाठी ११ जागा या लॉटरी पध्दतीने आरक्षित केल्या जाणार आहेत.
सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४९ जागा
महापालिका सभागृहातील ४९ जागा या सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या राहणार आहेत. ज्या ज्या प्रभागात अनुसुचित जाती पुरुष व महिला तसेच इतर मागास प्रवर्गातील पुरुष व महिला हे आरक्षण सोडून प्रत्येक प्रभागात दाेन जागा या सर्वसाधारण प्रवर्गासाठी असतीत. त्याशिवाय नऊ प्रभागांत तीन जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी असतील. सर्वसाधारण प्रवर्गासाठीच्या ४९ जागापैकी २५ जागा याच प्रवर्गातील महिलांसाठी लॉटरी पध्दतीने आरक्षण दिले जाईल.