Lok sabha 2024: राहुल आवाडे हातकणंगले मतदारसंघातून हातात घेणार ‘मशाल’; दोन दिवसांत ‘मातोश्री’वर जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 13:14 IST2024-03-29T13:13:42+5:302024-03-29T13:14:06+5:30
कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेची मशाल हातात घेण्याच्या तयारीत आहेत. येत्या ...

Lok sabha 2024: राहुल आवाडे हातकणंगले मतदारसंघातून हातात घेणार ‘मशाल’; दोन दिवसांत ‘मातोश्री’वर जाणार
कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे हे हातकणंगलेलोकसभा मतदारसंघातून शिवसेनेची मशाल हातात घेण्याच्या तयारीत आहेत. येत्या दोन दिवसांत ते ‘मातोश्री’वर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. गुरुवारी कोल्हापुरात झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत तसा निर्णय झाला. आमदार प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीतच ही बैठक झाली. त्यामुळे हातकणंगले मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता बळावली आहे.
गेल्या दोन निवडणुकांपासून आपण तयारी करतोय; पण, प्रत्येकवेळी वरिष्ठांकडून थांबवले जाते. किती दिवस दुसऱ्यांच्या विजयासाठी राबायचे? आता कोणत्याही परिस्थितीत माघार नाही, राहुल आवाडे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, अशी चर्चा बैठकीत करण्यात आली. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ही जागा लढवायची ठरविली तर प्रसंगी त्यांची मशाल हातात घ्या; पण, निवडणूक लढवा, असा दबावच पदाधिकाऱ्यांनी आवाडे यांच्यावर आणला.
कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार लक्षात घेत येत्या दोन दिवसांत (शनिवारपर्यंत) वरिष्ठांशी चर्चा करून पुढील भूमिका जाहीर करू, असा शब्द आमदार आवाडे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू असतानाच शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय पवार यांनी आमदार आवाडे यांची भेट घेतल्याने खळबळ उडाली.
आवाडे-पवार यांच्यात चर्चा
शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय पवार आल्यानंतर आमदार आवाडे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतून बाहेर येत त्यांच्याशी पंधरा ते वीस मिनिटे बंद खोलीत चर्चा केली.
कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवा, असा कार्यकर्त्यांचा दबाव आहे. मलाही ही शेवटची संधी आहे. त्यामुळे आता माघार नाही, निवडणूक लढवणारच. - राहुल आवाडे, इच्छुक उमेदवार