Kolhapur Municipal Election 2026: 'पोस्टल' धाकधूक वाढवणार... ईव्हीएम थेट निकालच लावणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 15:43 IST2026-01-14T15:41:34+5:302026-01-14T15:43:36+5:30
शुक्रवारी शाळांना सुट्टी

छाया: आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी होत असून, त्याची तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी दहा वाजता सुरू होणाऱ्या मतमाेजणीचे सर्व निकाल दुपारी एक वाजेपर्यंत जाहीर होतील, असे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले. मतमोजणीत अगोदर पोस्टल मतांची व लगेचच ईव्हीएमवरील मतांची मोजणी होणार आहे.
रमणमळा शासकीय गोदाम येथे नऊ प्रभागांची, व्ही. टी. पाटील सभागृह येथे पाच, गांधी मैदान पॅव्हेलियन येथे तीन, तर दुधाळी येथे तीन प्रभागांची मतमोजणी होणार आहे. चारही ठिकाणी एकाच वेळी सकाळी दहा वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल.
वाचा : प्रचाराची सांगता; रात्रीच्या जोडण्यांचा 'खेळ' सुरू
मतमोजणीसाठी काही ठिकाणी दहा तर काही ठिकाणी पंधरा टेबलची मांडणी करण्यात आली आहे. एका टेबलवर एक सुपरवायझर, एक असिस्टंट व एक चतुर्थ कर्मचारी असे कर्मचारी नियुक्त केले आहेत. प्रथम पोस्टल मतदान मोजले जाईल. या मतमोजणीची प्रक्रिया साधारणपणे एक तासात पूर्ण होईल. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरील मतांची मोजणी सुरु केली जाईल. प्रत्येक वार्डच्या मतमोजणीवेळी उमेदवाराचा एक प्रतिनिधी उपस्थित असेल.
वाचा : सतेज पाटील-क्षीरसागर गल्लीत भेटले...जुन्या आठवणीत रमले
मतमोजणी केंद्रावरील सर्व कर्मचाऱ्यांना दोन सत्रात प्रशिक्षण देण्यात आले आहे. मंगळवारी रमणमळा शासकीय धान्य गोदाम व व्ही.टी. पाटील सभागृहात मतमोजणीची रंगीत तालीम पार पडली. यावेळी प्रशासक के. मंजुलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ उपस्थित होते.
मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांना साहित्यासह पोहचविण्यासाठी केएमटीच्या ६५ बसेस तर मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान यंत्रे मतमोजणीच्या ठिकाणी नेण्यासाठी ४५ एस.टी. बस व तीन जीप आरक्षित करण्यात आल्या आहेत. मतमोजणीच्या परिसरात पार्किंगची सोय करून देण्यात आली आहे.
कुठे होणार कोणत्या प्रभागांची मतमोजणी..?
रमणमळा शासकीय गोदाम : नऊ (प्रभाग क्रमांक - १, २, ५, १२, १३, १४, १६, १७, १८)
व्ही. टी. पाटील सभागृह : पाच (प्रभाग क्रमांक - ३, ४, ९, १५, २०)
गांधी मैदान पॅव्हेलियन : तीन (प्रभाग क्रमांक -१०, ११, १९)
दुधाळी पॅव्हेलियन : तीन (प्रभाग क्रमांक - ६, ७, ८)
चारही ठिकाणी एकाच वेळी सकाळी दहा वाजता मतमोजणीस प्रारंभ.
शुक्रवारी शाळांना सुट्टी
शुक्रवारी ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे, त्या परिसरातील शाळांनाच फक्त सुट्टी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
आजही होणार पोस्टल मतदान
निवडणूक कामात असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आज, बुधवारी सकाळी आठ ते दहा यावेळेत पोस्टल मतदान करण्याची मुभा देण्यात आली आहे. ८०० पैकी ७२६ कर्मचाऱ्यांनी यापूर्वीच मतदान केले आहे. उर्वरित मतदारांना यावेळी मतदान करता येणार आहे.