Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत ११ अर्ज अवैध; छाननीदरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवारांनी फोडला घाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 17:23 IST2026-01-01T17:21:11+5:302026-01-01T17:23:04+5:30
संभाव्य हरकती लक्षात घेऊन उमेदवारांनी युक्तिवादासाठी वकिलांची फौज तयार ठेवली होती

Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत ११ अर्ज अवैध; छाननीदरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवारांनी फोडला घाम
इचलकरंजी : महानगरपालिका निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या ४५६ अर्जांमधील ११ अर्ज छाननीमध्ये अवैध ठरविण्यात आले. काही उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांविरुद्ध अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण, जातपडताळणी प्रमाणपत्र यासंदर्भात घेतलेल्या हरकतींमुळे उमेदवारांचा काळजाचा ठोका चुकला होता. वकिलांच्या मदतीने उमेदवारांनी हरकतींवर युक्तिवाद केला. संभाव्य हरकती लक्षात घेऊन उमेदवारांनी युक्तिवादासाठी वकिलांची फौज तयार ठेवली होती. बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली.
महानगरपालिका निवडणुकीसाठी चार प्रभाग समिती कार्यालयांत छाननीची प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर विविध विषयांवर हरकती घेण्यात आल्या. जुन्या नगरपालिकेमध्ये असलेल्या अ प्रभाग समिती कार्यालयात अमरजित राजाराम जाधव यांनी रणजित दिलीप लायकर यांच्याविरोधात हरकत घेतली होती. अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यामुळे त्यांना अपात्र करावे, अशी त्यांची हरकत होती. नोटीस दिल्यामुळे अपात्र करता येत नाही. ते आपल्या कार्यकक्षेत येत नाही. बांधकामामुळे निवडणुकीस उभे राहण्यास बंदी करता येत नसल्याने जाधव यांची हरकत फेटाळली.
रुबेन सखाराम आवळे यांनी अब्राहम किसन आवळे यांच्याविरूद्ध महानगरपालिकेच्या थकबाकीसंदर्भात हरकत घेतली होती. किसन आवळे यांच्या नावावर थकबाकी आहे. मात्र, उमेदवाराच्या नावावर थकबाकी असल्याचे दिसून येत नसल्याने रुबेन आवळे यांची हरकत फेटाळली. तसेच जातपडताळणी प्रमाणपत्रासंदर्भात घेतलेल्या हरकतीची खातरजमा केल्यानंतर ती हरकतही निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा सिंघण यांनी फेटाळली. शिव-शाहू विकास आघाडीने दिलेल्या १ ते १६ सर्व बी फॉर्मवर एकत्रित उल्लेख असून, प्रत्येक प्रभागातील जागेचा स्वतंत्र उल्लेख नसल्याची हरकत घेण्यात आली होती. मात्र, तीही फेटाळण्यात आली.
प्रभाग समिती कार्यालय अ मध्ये दोन अर्ज अवैध ठरले. राजू महादेव सोलगे यांनी १६ ब मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी जातपडताळणी प्रमाणपत्राचे टोकन जमा न केल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. तसेच १६ अ मधून सुशिला दत्तात्रय माळी यांनी भाजप पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, बी फॉर्म दिला नाही. तसेच जातपडताळणी प्रमाणपत्र दाखविले नाही. ते हरवले आहे, असे सांगितले. त्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला.
प्रभाग समिती कार्यालय ब मध्ये विशाल सुनील धुमाळ प्रभाग क्रमांक १४ क मध्ये यांच्या अर्जाची पडताळणी झाली. त्यांनी उद्धवसेनेतून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, सूचक अनुमोदक यांच्या उमेदवारी अर्जावर सह्या नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. प्रभाग क्रमांक १० मधील उमेदवार रवी रजपुते यांचा जातीचा दाखला ओबीसी असताना त्यांनी मागासवर्गीय जागेवरून उमेदवारी दाखल केली आहे. त्यांच्याकडचा मागासवर्गीय हा जातीचा दाखला चुकीचा असल्याचा आक्षेप शिव-शाहू आघाडीचे उमेदवार अजय अशोक भोरे यांनी घेतला. तो फेटाळण्यात आल्याने भोरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगितले.
हिमानी सागर चाळके यांच्या नावाबद्दल प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आक्षेप घेतला. परंतु, मतदार यादीतील नावाप्रमाणे उमेदवारी असल्याने तो फेटाळण्यात आला. प्रभाग समिती कार्यालय क मध्ये संजय अथणे यांनी प्रभाग क्रमांक ४ मधून अर्ज दाखल केला होता. मात्र, जातपडताळणीचे टोकन न दिल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला. प्रभाग समिती कार्यालय क शहापूरमध्ये प्रभाग क्रमांक ७ क किरण कांबळे यांच्या अर्जाची छाननी झाली. त्यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक व अनुमोदकसाठी एकाच व्यक्तीची सही असल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला.