Kolhapur Municipal Election 2026: कोल्हापुरात दोन ठिकाणी वादावादी, २१ अर्ज ठरले बाद; छाननीची प्रक्रिया पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 12:03 IST2026-01-01T12:02:54+5:302026-01-01T12:03:27+5:30
आता लक्ष अर्ज माघारीकडे

Kolhapur Municipal Election 2026: कोल्हापुरात दोन ठिकाणी वादावादी, २१ अर्ज ठरले बाद; छाननीची प्रक्रिया पूर्ण
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत दाखल झालेल्या ८२० पैकी २१ नामनिर्देशनपत्रे बुधवारी छाननीत अवैध ठरली. दोन निवडणूक कार्यालयांत झालेली किरकोळ वादावादी वगळता छाननी प्रक्रिया शांततेत पार पडली. या छाननीदरम्यान, सर्व सातही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उमेदवार व समर्थकांनी गर्दी केली होती. यावेळी चोख पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. आता उमेदवारांच्या व राजकीय पक्षांच्या जोडण्या आपल्याला जड जाणाऱ्या तुल्यबळ उमेदवाराने माघार घ्यावी, यासाठी सुरू झाल्या आहेत.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील राजकीय पक्षांची इर्षा लक्षात घेता छाननीवेळी वादविवाद होतील, तणाव निर्माण होईल, असे वाटले होते. परंतु, सर्व प्रक्रिया शांततेत आणि तणावविरहित वातावरणात पार पडल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला.
सकाळी ११ वाजता एकाचवेळी सातही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांत नामनिर्देशनपत्रांची छाननी सुरू झाली. एक एक उमेदवाराचे नाव पुकारत छाननी पूर्ण केली जात होती. कोणाची हरकत नसेल तर पुढील नाव पुकारले जात होते. ज्यांच्या नामनिर्देशनपत्रांवर हरकत आहे त्यांचे म्हणणे तसेच उमेदवाराचे म्हणणे ऐकून घेतले जात होते.
यांचे अर्ज ठरले बाद
बुधवारी झालेल्या छाननीत प्रशांत माळी (५ अ), देवेंद्र जोंधळे (३ अ), वंदना मोहिते (३ क), जयश्री वकीलकर (४ अ), सुनीता माने (४ ब), अर्णव संकपाळ (४ क), विजय गायकवाड ( १५ अ), धनश्री जाधव (६ क), श्रीराम देशपांडे (६ ड), आसमा मुल्लीणी (७ ब व ८ ब), शीतल भालेकर (८ अ), रमेश खाडे (८ ड), अरुणा पाटील ( (८ ड), विजय दरवान (११ ड), संदीप सावंत (१९ ड), शेखर साळवी (१२ अ), शाबाद अत्तार (१३ ड), वैशाली मिसाळ (१७ अ), महेजबीन शेख (१८ ब) यांचे अर्ज बाद ठरले.
उत्तुरे, आजरेकर यांच्या अर्जावर हरकत
राजारामपुरी व्ही. टी. पाटील सभागृहात उद्धवसेनेच्या उमेदवार प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांच्या नामनिर्देशनपत्रावर हरकत दाखल झाली. त्यावर बराच वेळ चर्चा, वाद सुरू होता. सुमारे दोन तास त्यावर चर्चा सुरू होती. परंतु, सायंकाळी हरकतदारानेच माघार घेतली. शहाजी महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रभाग क्रमांक १२ अ मधील आश्कीन गणी आजरेकर यांच्या अर्जावर देखील हरकत घेण्यात आली होती, परंतु ती फेटाळण्यात आली.