इचलकरंजी महापालिकेत महापौरपदासाठी पडले ओबीसी आरक्षण, इच्छुकांची भाऊगर्दी; 'ही' नावे चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 15:16 IST2026-01-22T15:14:47+5:302026-01-22T15:16:44+5:30
आवाडे-हाळवणकर पैकी कोणत्या गटाला संधी?, २० वर्षानंतर पुरूष चेहऱ्याला संधी

इचलकरंजी महापालिकेत महापौरपदासाठी पडले ओबीसी आरक्षण, इच्छुकांची भाऊगर्दी; 'ही' नावे चर्चेत
इचलकरंजी : येथील महानगरपालिकेच्या महापौरपदासाठीचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्गाचे पडले आहे. त्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार, येत्या चार दिवसांत स्पष्ट होणार आहे.
प्रथमच महानगरपालिकेची निवडणूक पार पडली. महापौरपदासाठी मुंबईत सोडत काढण्यात आली. त्यामध्ये इचलकरंजीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गाचे आरक्षण पडले. नागरिकांचा मागास प्रवर्गाचे खुले आरक्षण असल्यामुळे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये तानाजी पोवार, राजू बोंद्रे, प्रदीप धुत्रे, विठ्ठल चोपडे, सतीश मुळीक, नितेश पोवार, सुशांत कलागते, योगेश पाटील, अभिषेक वाळवेकर, ओमकार सुर्वे, उदय धातुंडे, राजू पुजारी, आदींचा समावेश आहे.
ओबीसी दाखला असलेले मात्र खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवून विजयी झालेल्या नगरसेवकांनाही महापौरपदाची निवडणूक लढविता येणार आहे. त्यामुळे महापौरपदासाठी चुरस असणार आहे. सुरेश हाळवणकर आणि प्रकाश आवाडे हे दोन गट सध्या भाजपमध्ये आहेत. कोणत्या गटाला महापौरपद जाणार, यावर महापौरपदाचा उमेदवार ठरणार आहे.
आता तरी आरक्षणाची सोडत झाली आहे. येथून पुढील चार दिवस महापौरपदाची उमेदवारी मिळविण्यासाठी रस्सीखेच असणार आहे. २६ जानेवारीनंतर महापौरपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. अद्याप महापौरपदाची निवडणूक जाहीर झालेली नाही.
२० वर्षानंतर पुरूष चेहऱ्याला संधी
नगरपालिका असताना मागील २० वर्षे महिला नगराध्यक्षा शहराचा गाडा चालवत होत्या. त्यानंतर आता महानगरपालिकेमध्ये ओबीसी खुला प्रवर्ग पडल्यामुळे २० वर्षानंतर पुरूष चेहऱ्याला शहराचा गाडा हाकण्याची संधी मिळणार आहे.