कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीत पापाची तिकटीवरून महाद्वारवर प्रवेश नाही, सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह टेहळणी मनोरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 19:12 IST2025-09-03T19:11:51+5:302025-09-03T19:12:38+5:30
बंदोबस्ताचे नियोजन सुरू

संग्रहित छाया
कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना यंदा पापाची तिकटीपासून बिनखांबी गणेश मंदिराकडे उलट्या दिशेने जाण्यासाठी प्रवेश मिळणार नाही. मिरजकर तिकटी आणि बिनखांबी गणेश मंदिरापासून प्रवेश केल्यानंतर नागरिकांना पापाची तिकटी आणि गंगावेश चौकातच बाहेर पडता येईल, अशी व्यवस्था पोलिसांकडून केली जात आहे. तसेच सुरक्षेसाठी मिरवणूक मार्गावर १८ सीसीटीव्ही कॅमेरे आणि सात ठिकाणी टेहळणी मनोरे तयार केले जात आहेत.
गणेश विसर्जन मिरवणुकीत मंडळांच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांची प्रचंड गर्दी असते. यात महिला आणि लहान मुलांचीही संख्या लक्षणीय असते. गर्दीमुळे मिरवणुकीत चेंगराचेंगरी, धक्काबुक्की होण्याचा धोका असतो. असे प्रसंग टाळण्यासाठी आणि नागरिकांना विनाअडथळा मिरवणूक पाहता यावी, यासाठी पोलिसांनी नागरिकांना एकमार्गी प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार मिरजकर तिकटी आणि बिनखांबी गणेश मंदिरापासून नागरिकांना मिरवणुकीत प्रवेश मिळेल. त्यांना पापाची तिकटी आणि गंगावेश चौकातून बाहेर पडता येईल. पापाची तिकटी येथून उलट्या दिशेने बिनखांबी गणेश मंदिराकडे जाता येणार नाही, अशी माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.
सुरक्षेसाठी उपाययोजना
मिरवणुकीवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांकडून मिरवणूक मार्गात १८ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सुरू आहे. याशिवाय काही व्यावसायिकांच्या कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महालक्ष्मी चौक, गुजरी कॉर्नर, पापाची तिकटी, गंगावेश आणि क्रशर चौक या सात ठिकाणी टेहळणी मनोरे उभे करण्याचे काम सुरू आहे.
बंदोबस्ताचे नियोजन सुरू
कोल्हापूर आणि इचलकरंजी येथील विसर्जन मिरवणुकीसाठी बंदोबस्ताचे नियोजन करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. कोल्हापुरातील बंदोबस्तासाठी एक हजाराहून जास्त पोलिस आणि तितक्याच होमगार्डची आवश्यकता असते. याशिवाय शीघ्र कृती दल, दंगल काबू पथकाचे जवानही तैनात असतात. दोन दिवसांत बंदोबस्ताचे नियोजन पूर्ण होईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांनी दिली.