Kolhapur Municipal Election 2026: प्रचाराची सांगता; रात्रीच्या जोडण्यांचा 'खेळ' सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 15:24 IST2026-01-14T15:22:12+5:302026-01-14T15:24:33+5:30
महापालिका निवडणुकीत कमालीची चुरस : उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

छाया: नसीर अत्तार
कोल्हापूर : कोल्हापूर शहराचा कारभार पुढील पाच वर्षाकरिता कोणाच्या हाती सोपवायचा याचा निर्णय देणारी महानगरपालिकेची निवडणूक उद्या, गुरुवारी होत असून या निर्णायक टप्प्यावर जाहीर प्रचाराची सांगता मंगळवारी सायंकाळी झाली. उघड प्रचार संपताच रात्रीच्या जोडण्यांनाही गती आली. आज, बुधवारची रात्रही अत्यंत महत्त्वाची असून ‘रात्रीस खेळ चाले’चा अनुभव येण्याची शक्यता असल्याने पोलिसांसह निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच पाच वर्षाहून अधिक काळ ही निवडणूक रखडली होती. त्यामुळे निवडणूक कधी होतेय याची उत्सुकता सर्वांनाच होती. एक महिन्यापूर्वी निवडणुकीची घोषणा झाली आणि सगळेच राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांनी जोरदार तयारी करून आपले राजकीय अस्तित्व तपासून बघण्याची संधी साधली. ५८ अपक्ष उमेदवारही जनसेवेसाठी आसुसलेले आहेत.
मागच्या महिन्याभरापासून शहरातील गल्लीबोळ, कॉलनी, उपनगरे प्रचाराच्या गलक्याने ढवळून निघाली. दिवसभर प्रचारफेऱ्या, गाठीभेटी, जाहीर सभा यामुळे शहर गजबजून गेले. रात्रीच्या जेवणावळींनी मंगल कार्यालये, शहरातील हॉटेल्स अक्षरश : हाऊसफुल्ल झाल्याचे पाहायला मिळाली. प्रचार सभेतील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. राजकीय नेत्यांनी एकमेकांची उणीदुणी काढली. आश्वासनांची खैरात करण्यात आली. सर्वसामान्य मतदारांनी मात्र सर्व उघड्या डोळ्यांनी पाहणे पसंद केले. मतदारांचा हा त्रयस्थपणा उद्याच्या निवडणुकीत विजय कोणाला द्यायचा ठरविणार आहे.
४८ माजी नगरसेवक पुन्हा रिंगणात
दोन माजी महापौर, दोन माजी उपमहापौर, स्थायी समितीचे चार माजी सभापती यांच्यासह ४८ माजी नगरसेवक पुन्हा एकदा निवडणूक लढण्यास सज्ज झाले आहेत. आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र पृथ्वीराज क्षीरसागर, विधानसभेची निवडणूक लढलेले राजेश लाटकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष आदिल फरास, शारंगधर देशमुख यांच्यासारखे मातब्बर उमेदवार देखील निवडणूक रिंगणात आहेत.
राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
महायुतीकडून पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, सत्यजित कदम यांची तर महाविकास आघाडीकडून खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे, संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
उमेदवारी मिळविण्यापासून चुरस
ही निवडणूक अतिशय चुरशीने होत आहे. विविध पक्षातील कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळविण्यापासून ते विजय मिळविण्यापर्यंत झगडावे लागत आहे. सर्वच वॉर्डात काटाजोड लढती होत असल्याने निवडणुकीतील रंगत वाढली आहे.
सर्वाधिक उमेदवार काँग्रेसचे, पाठोपाठ भाजप
निवडणुकीत सर्वाधिक ७४ उमेदवार काँग्रेसने रिंगणात उतरविले आहेत तर एकास पुरस्कृत केले आहे. पाठोपाठ भाजपने ३५ उमेदवार दिले आहेत. शिंदेसेनेचे ३२, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे १४, जनसुराज्य पक्षाचे २९, उद्धवसेनेचे ६, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे १७, आपचे १४, वंचित बहुजन आघाडीचे १०, हिंदू महासभेचे ४ तर बीएसपीचे ३ उमेदवार दिले आहेत. एकूण ३२७ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.
महिला देखील आघाडीवर
८१ जागापैकी ४१ जागा महिलांना राखीव आहेत. या सर्व जागांवर एकूण १५७ महिला निवडणूक लढवीत आहेत. त्यातील ३४ महिला अपक्ष म्हणून लढत आहेत.
अनेक ठिकाणी बहुरंगी लढती
वीस प्रभागातील १७ जागांवर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होत आहे. १९ ठिकाणी तिरंगी, १८ ठिकाणी चौरंगी, १२ ठिकाणी पंचरंगी तर १५ ठिकाणी बहुरंगी लढती होताना पहायला मिळत आहे. काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत तब्बल ३४ ठिकाणी होत आहे.