ईडीच्या धाकाने नव्हे तर.., मंत्री हसन मुश्रीफांनी सत्तेत जाण्यामागचं सांगितलं नेमकं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 01:27 PM2023-07-08T13:27:07+5:302023-07-08T13:28:06+5:30
२०२४ ची विधानसभा लढणार
कागल : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजच भाजपाला पाठिंबा देतो आहे असे नाही. २०१४ मध्ये बाहेरून पाठिंबा दिला होताच. २०१७ व २०१९ मध्येही अशी चर्चा झाली. पक्षश्रेष्ठीच्या सहमतीनेच अजितदादा पवार ही सर्व चर्चा करीत होते. या वेळी मात्र त्यांनी एकाकी पडायला नको म्हणून आम्हा आठ नऊ जणांना साक्षीसाठी घेतले. माझ्यावर ईडी व इतर संस्थाची कारवाई खूप आधीपासून सुरू होती. या कारवाईला घाबरून आपण भाजपात गेलो नाही. त्यामुळे ईडीच्या धाकाने नव्हे तर अजितदादा एकटे पडू नयेत म्हणून आपण हा निर्णय घेतला आहे, असे प्रतिपादन राज्याचे नूतन मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी केले.
राज्याचे मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल कागल येथे गैबी चौकात त्यांचा नागरी जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शरद पवार हेच आमचे नेते आहेत. जशा सर्व पालख्या वेगवेगळ्या ठिकाणाहून निघून शेवटी पंढरीत येतात. तशी आमची ही राजकीय पालखी शरद पवाररूपी पंढरीकडेच जाणारी आहे. आता काही तरी इकडे तिकडे दिसत असले तरी पुढे सर्व काही चांगलेच चित्र दिसेल. आमचे कालही व आजही पवार एके पवारच आहे, असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले.
यावेळी सायराबी मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, नवीद मुश्रीफ, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, अनिल सांळोखे, सतीश पाटील, वसंतराव धुरे, काशीनाथ तेली, सुधीर देसाई, शशिकांत पाटील चुयेकर, युवराज पाटील, गणपतराव फराकटे, चंद्रकांत गवळी, नाना कांबळे, साजीद मुश्रीफ, अमरीन मुश्रीफ जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने यांनी स्वागत प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, महिला आघाडीच्या शीतल फराकटे, विजय काळे यांची भाषणे झाली. शहराध्यक्ष संजय चितारी यांनी आभार मानले.
२०२४ ची विधानसभा लढणार !
समरजित घाटगे यांनी २०२४ ची विधानसभा लढणार व जिंकणार असे म्हटले होते. यावर मंत्री मुश्रीफ यांनी कोणते भाष्य केले नाही; पण २०२४ च्या विधानसभा निवडणुकी वेळी आपण ईडीचा मला व माझ्या कुटुंबीयांना झालेला त्रास गावागावात येऊन सांगू, तसेच मी मतदारसंघात किती प्रचंड निधी आणला याचे पुस्तकही तेव्हाच प्रकाशित करू, असे म्हणून विधानसभा लढणार असल्याचेच सूचित केले.
मी उतावीळ, अपरिपक्व नाही
मंत्री मुश्रीफ म्हणाले की, मी अपरिपक्व, उतावीळ आणि फाजील आत्मविश्वास बाळगणारा नाही. एखाद्या घटनेने मी कधीही विचिलित होत नाही. टीव्ही फोडत नाही की काच फोडत नाही. फोन स्विच ऑफ करून बसण्याची कधी वेळ माझ्यावर आलेली नाही. हे कोणाला उद्देशून म्हटले याचा बोध झाल्याने उपस्थितानी हसून दाद दिली.
समरजित घाटगे यांच्यावर टीका
भय्या माने यांनी समरजित घाटगे यांच्यावर थेट टीका करीत त्यांना का राग आला आहे, हे सर्वांना समजले आहे. ते म्हणतात विधानसभेचे भूमिपूजन केले. भूमिपूजनच काय आमची वास्तुशांती पण झाली आहे. वास्तविक नरेंद मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही पाठिंबा दिला याचे घाटगेंनी कौतुक करायला हवे होते.
तुमच्यामुळे ईडीतून बाहेर पडत आहे
मी आयुष्यात कधी सूडभावनेने राजकारण केले नाही. उलट आडचणीत सापडलेल्या विरोधकांनाही मदत केली. मला मात्र काहींनी त्रास दिला. गेली वर्षभर अंत्यत त्रासातून मला जावे लागले. न्यायालयानेही कारवाईला स्थगिती दिली. तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने मी ईडीच्या त्रासातून सही सलामत आता बाहेर पडत आहे.