Kolhapur Politics: संस्थेला मदत पाहिजे तर महायुतीत या, काँग्रेसच्या राहुल पाटील यांना ऑफर

By राजाराम लोंढे | Updated: March 24, 2025 11:47 IST2025-03-24T11:44:09+5:302025-03-24T11:47:00+5:30

राजाराम लोंढे कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील ‘भोगावती’ साखर कारखान्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी राज्य व केंद्र सरकारचा आर्थिक ...

Minister Hasan Mushrif offered to join the Mahayuti with Congress Rahul Patil | Kolhapur Politics: संस्थेला मदत पाहिजे तर महायुतीत या, काँग्रेसच्या राहुल पाटील यांना ऑफर

Kolhapur Politics: संस्थेला मदत पाहिजे तर महायुतीत या, काँग्रेसच्या राहुल पाटील यांना ऑफर

राजाराम लोंढे

कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील ‘भोगावती’ साखर कारखान्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी राज्य व केंद्र सरकारचा आर्थिक डोस महत्त्वाचा असून आगामी पाच वर्षात सत्तेच्या टॉनिकाशिवाय गटाची ताकद वाढवणे अशक्य असल्याने दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे सुपुत्र, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी महायुतीसोबत जावे, यासाठी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा दबाव वाढत आहे. आठवड्यापूर्वी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीसोबत येण्याची ऑफर दिल्याने या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे.

पाच वर्षाचा अपवाद वगळता ‘भोगावती’ कारखान्यावर दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांची कायम सत्ता आहे. सध्या कारखाना आर्थिक अडचणीत आहे, साधारणता १२५ कोटीची देणी आहेत. त्यामुळे शासनाच्या मदतीची गरज आहे. आतापर्यंत जिल्हा बँकेचे अध्यक्ष, मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘भोगावती’ला मदत केली आहे. आठवड्यापूर्वी राहुल पाटील, ‘भोगावती’चे अध्यक्ष शिवाजी पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने मंत्री मुश्रीफ यांची भेट घेतली. कारखान्याला अर्थसहाय्य करण्याची मागणी केली. पण, महायुतीमध्ये झालेल्या निर्णयाची माहिती देत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येण्याची ऑफर दिली. 

त्यानंतर श्रीपतरावदादा बँकेतही प्रमुख चौघांची बैठक झाली. ‘भोगावती’ची अडचण, पाच वर्षे सत्तेविना गटाची ताकद वाढणार का? यासह इतर गोष्टींवर चर्चा झाली. एकदम निर्णय घेण्यापेक्षा प्रमुखांशी चर्चा करून राजकीय दिशा ठरवण्यावर शिक्कामोर्तब झाले. या आठवड्यात बैठक होणार होती, पण उद्योगपती धीरज पाटील यांचे अपघाती निधन झाल्याने बैठक होऊ शकली नाही. भाजपने ‘भोगावती’ला आर्थिक मदत व विधानपरिषदेवर संधी अशी ऑफर दिल्याचे समजते. त्यामुळे राष्ट्रवादीपेक्षा भाजपसोबतच जावे, असाही काहींचा मतप्रवाह आहे.

मदत पाहिजे तर महायुतीत या

साखर कारखाने असो किंवा कोणतीही सहकारी संस्थेला शासनाकडून आर्थिक मदत हवी असेल तर महायुतीतील तीन पैकी कोणत्याही पक्षात या. त्याशिवाय मदत न करण्याचा निर्णय तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे.

निर्णय काँग्रेसनिष्ठांना पचनी पडणार का?

दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचा सहा पैकी चार विधानसभा निवडणुकीत पराभव झाला तरी त्यांनी वैचारिक भूमिका बदलली नाही. त्यामुळे ‘राहुल’ यांचा पक्षांतराचा निर्णय काँग्रेसनिष्ठांना पचनी पडणार का? त्यांच्यासोबत सगळेच पदाधिकारी येणार का? याबाबत साशंकता आहे.

भाजपची अशीही व्यूहरचना

राष्ट्रवादी शरद पवार गट व उद्धवसेनेपेक्षा काँग्रेसचे नेते पक्षात घेण्याकडे भाजपचा जास्त कल आहे. काँग्रेसमध्ये जनाधार असलेले, अनेक वर्षे निष्ठावान असलेले नेते फोडून पक्षात घ्यायचे व २०२९ मध्ये स्वबळावर विधानसभा निवडणुकीला सामारे जायचे, अशी पक्षाची व्यूहरचना असल्याचे सूत्रांकडून समजते.

एक एप्रिलला कोणी तरी माझे एप्रिल फूल करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसते. मी काँग्रेसमध्येच आहे. कार्यकर्त्यांनी कोणत्याही चर्चेवर विश्वास ठेवू नये - राहुल पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष

Web Title: Minister Hasan Mushrif offered to join the Mahayuti with Congress Rahul Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.