Lok Sabha Election 2019 : राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 17:17 IST2019-04-01T17:15:40+5:302019-04-01T17:17:33+5:30
धनंजय महाडिक यांनी केलेली कामे घराघरांत पोहोचवा, त्यांना शहरातून मताधिक्य देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने प्रयत्न करावेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. दरम्यान, मी कोल्हापूरचा उमेदवार असल्याने शहरातून मला जास्तीत जास्त मताधिक्य द्यावे, असेही आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.

Lok Sabha Election 2019 : राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
कोल्हापूर : धनंजय महाडिक यांनी केलेली कामे घराघरांत पोहोचवा, त्यांना शहरातून मताधिक्य देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने प्रयत्न करावेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. दरम्यान, मी कोल्हापूरचा उमेदवार असल्याने शहरातून मला जास्तीत जास्त मताधिक्य द्यावे, असेही आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.
काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या निवडणूूक संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते व आमदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, जनसुराज्य शक्तीचे प्रा. जयंत पाटील, उद्योगपती व्ही. बी. पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार हा आता रस्त्यावरून घराघरांत पोहोचवा. महाडिक यांनी गेल्या पाच वर्षांत केलेली कामे पाहून जनता शिवसेनेला मतदानच करणार नाही. कार्यकर्त्यांनी ताकदीने काम केल्यास शहरातील जनता राष्ट्रवादीला नक्कीच कौल देईल.
आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, महाडिक यांनी संसदेत अनेक प्रश्न विचारुन प्रश्नांना वाचा फोडली. शिवाजी पुलासह विविध प्रश्न मार्गी लावले. विमानसेवा सुरू झाल्यामुळे औद्योगिक क्रांती होऊन बेरोजगारी कमी होईल. एकसंध राहून खासदार महाडिक यांना विजयी करावे.
खासदार महाडिक म्हणाले, पाच वर्षांतील कामाची शिदोरी घेऊन मतदारांसमोर जात आहे. मीही कोल्हापूरचा आहे, त्यामुळे कोल्हापूरकरांनी आपला उमेदवार म्हणून मला मताधिक्य द्यावे.
शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी प्रास्ताविकात, राष्ट्रवादीचे सर्व आजी-माजी नगरसेवक आमच्यासोबतअसून कोणीही गद्दार नाही. काँग्रेसचे नगरसेवक दिसत नाहीत, त्यांचेही मतपरिवर्तन करू, पण महाडिक यांना निवडून आणू, असे सांगितले.
यावेळी माजी महापौर बाजीराव चव्हाण, माजी उपमहापौर परिक्षित पन्हाळकर, नगरसेवक मुरलीधर जाधव, किरण शिराळे, राजाराम गायकवाड, उत्तम कोराणे, अफजल पिरजादे, महेश गायकवाड, आदिल फरास, अजित राऊत, रामचंद्र भाले, प्रकाश गवंडी, अमोल माने, आनंदराव पायमल, काका पाटील, नितीन पाटील, रफीक मुल्ला, निशिकांत सरनाईक, बाबासाहेब पाटील, जहिदा मुजावर, माई वाडीकर, मिरा सरनाईक, आदी उपस्थित होते.
‘जनसुराज्य’चे नेते आमच्यासोबत
प्रा. जयंत पाटील यांचा अनेकांनी जनसुराज्यचे नेते असा उल्लेख केला, तर प्रा. पाटील यांनी, जनसुराज्य पक्षाचे मला माहीत नाही, पण मी माझ्या कार्यकर्त्यांसह महाडिक यांना पाठीशी असल्याचे जाहीर केले, तर हाच धागा धरून माजी मंत्री जयंत पाटील यांनी, जनसुराज्य पक्ष आमच्यासोबत आहे की नाही माहीत नाही, पण त्या पक्षाचे नेते आमच्यासोबत असल्याची कोपरखळी मारली, तर व्ही. बी. पाटील हेही उपस्थित राहिल्याने पाटील यांनी समाधान व्यक्त केले.