विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 16:18 IST2025-12-25T16:16:22+5:302025-12-25T16:18:42+5:30
Kolhapur Municipal Election: कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होत असून, खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक रिंगणात उतरणार आहेत. विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण, त्यांना संधी मिळाली नव्हती.

विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक हे कोल्हापूर महापालिका निवडणुकीत रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कृष्णराज महाडिक यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण, त्यावेळी संधी मिळाली नाही. आता महापालिका निवडणुकीपासून त्यांनी राजकीय वाटचाल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होत असन, कृष्णराज महाडिक भाजपकडून निवडणूक लढवणार आहेत. आपल्याला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी निवडणूक लढवण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.
मला पक्षाकडून आदेश मिळाले
एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना कृष्णराज महाडिक म्हणाले, "मला तिकीट मिळण्याच्या किंवा निवडणूक लढवण्याच्या प्रक्रियेमध्ये माझ्या कुटुंबाचा कोणताही सहभाग नाही. हा आदेश मला पक्षाकडून मिळाला आहे."
"कोल्हापूर अशा लोकांच्या हातामध्ये पडले होते, ज्यांना वेगाने तिथे विकास करता आला नाही. आता आम्ही ते सगळं मोडून काढणार आहोत. मी याबद्दल फार उत्साही आहे. राजकारणात काम करण्याची इच्छा होती. भाजपाच्या माध्यमातून ते होणार आहे", असे कृष्णराज महाडिक यांनी सांगितले.
कृष्णराज महाडिक कोणत्या प्रभागातून लढवणार निवडणूक?
"माझ्या कुटुंबाचा मला फार अभिमान आहे. आता तिसरी पिढी राजकारणामध्ये येत आहे. त्यामुळे फार चांगलं वाटत आहे. रुईकर कॉलनी, महाडिक कॉलनी. ज्या प्रभागामध्ये मी राहतो आणि माझे ऑफिस सुद्धा तिथेच आहे. माझे संपूर्ण सोशल मीडियाच्या माध्यमातून जे सामाजिक उपक्रम आहेत, ते जे सगळे बघतात, ते त्याच ऑफिसमधून केले जातात", असे कृष्णराज महाडिक म्हणाले.
महाडिक कॉलनीतील प्रभाग क्रमांक ३ मधून निवडणूक लढवणार आहे. माझी आता तयारी सुरू आहे. प्रभाग तीन पुरताच मर्यादित न राहता कोल्हापूर शहरासाठी काम करणार आहे. मागील दोन वर्षांपासून मी तिथे काम करत आहे. अनेक अडीअडचणी आहेत, ज्या सोडवण्यासाठी मला काम करायचे आहे", असेही ते म्हणाले.