कोल्हापूरमध्ये मतमोजणीच्या सुरुवातीलाच भाजपाचा चौकार, प्रभाग क्र. ३ मध्ये ४ उमेदवार विजयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 11:10 IST2026-01-16T11:09:38+5:302026-01-16T11:10:16+5:30
Kolhapur Municipal Election Results 2026: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, मतमोजणीच्या सुरुवातीलाच भाजपाने विजयी चौकार ठोकला आहे. महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ३ मधील भाजपाचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत.

कोल्हापूरमध्ये मतमोजणीच्या सुरुवातीलाच भाजपाचा चौकार, प्रभाग क्र. ३ मध्ये ४ उमेदवार विजयी
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, मतमोजणीच्या सुरुवातीलाच भाजपाने विजयी चौकार ठोकला आहे. महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ३ मधील भाजपाचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या ८१ जागांसाठी गुरुवारी चुरशीने ६६.५४ टक्के मतदान झाले होते.
प्रभाग क्रमांक ९ मध्ये सुरुवातीला आघाडीवर असलेले काँग्रेसचे उमेदवार राहुल माने यांचा पराभव झाला. माजी स्थायी समिती सभापती शिंदेसेनेचे उमेदवार शारंगधर देशमुख यांनी विजयी गुलाल उधळला. या मतदार संघात काटाजोड लढत झाल्याने निकालाकडे संपुर्ण शहराचे लक्ष लागून होते. कारण शारंगधर देशमुख यांनी काँग्रेसची साथ सोडून शिंदेसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले होते.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधून भाजपाचे प्रमोद देसाई, राजनंदा महाडिक, वंदना मोहिते, विजेंद्र माने हे उमेदवार विजयी झाले आहेत.
महानगरपालिकेत जनसुराज्य पक्षाने पहिलं खातं उघडलं आहे. प्रभाग क्रमांक 10 मधून अक्षय जरग विजयी झाले. काँग्रेसमधून तिकीट न मिळल्याने जरग यांनी जनसुराज्य पक्षात प्रवेश केला होता. यामुळे या लढतीकडे शहरवासियांचे लक्ष लागून होते.
याच प्रभागत शिंदेसेनेचे अजय इंगवले विजयी झाले असून त्यांनी काँग्रेसचे दत्ता टिपूगडे यांना पराभूत केले. भाजपच्या अर्चना उत्तम कोराने यांनी काँग्रेसच्या प्रनोती पाटील यांचा पराभव केला.
आमदार सतेज पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा बावड्यातील काँग्रेसचे सर्व ४ उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिकेसाठी काल, गुरुवारी मोठ्या चुरशीने ६६.५४ टक्के मतदान झाले. आज, शुक्रवारी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. चार ठिकाणी मतमोजणी सुरु असल्याने काही तासात निकाल हाती येणार आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजप १५, शिंदेसेना ३, काँग्रेस १७, राष्ट्रवादी (अजित पवार) ३, उद्धवसेना २ जागेवर आघाडीवर असल्याचा कल दिसत आहे.