कोल्हापूर महानगरपालिकेचे मुख्यालय होणार शेंडापार्कात; पाच एकर जागा हस्तांतर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 13:48 IST2026-02-11T13:48:31+5:302026-02-11T13:48:52+5:30
अजित पवार यांनी दिले होते ८० कोटींचे आश्वासन

कोल्हापूर महानगरपालिकेचे मुख्यालय होणार शेंडापार्कात; पाच एकर जागा हस्तांतर
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसाठी शेंडा पार्क येथील दोन हेक्टर (पाच एकर) जागा हस्तांतरित करण्यात आली. त्यामुळे नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यातील अडचणी आता दूर झाल्या आहेत.
भावसिंगजी रोडवर महानगरपालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत असून, या संस्थानकालीन इमारतीतून महापालिकेचा स्थापनेपासून कारभार चालवला जात आहे. ही इमारत अपुरी पडू लागल्यामुळे नव्या प्रशासकीय इमारतीसाठी जागेची मागणी करण्यात येत होती.
याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शेंडापार्क इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या गट नंबर ६०२/२ मधील दोन हेक्टर जागा प्रशासकीय इमारतीसाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिल होते. ६ फेब्रुवारीला आदेश दिल्यानंतर जमिनीच्या सातबारा पत्रकात इतर हक्कांमध्ये महानगरपालिकेच्या नावाची नोंद करण्यात आली आहे.
पाच एकरांच्या विस्तीर्ण परिसरामध्ये महानगरपालिकेची प्रशासकीय इमारत, पार्किंग, नागरी सुविधा केंद्र, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची दालने, तसेच सभागृह उभारण्यात येणार असून लवकरच यासंबंधीची निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
अजित पवार यांनी दिले होते ८० कोटींचे आश्वासन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी पहिल्या टप्प्यात ८० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन दिले होते. यासंदर्भात अपघात होण्याच्या आदले दिवशी म्हणजेच दि. २७ जानेवारीला अजित पवार आणि आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांचे फोनवर बोलणे झाले होते. प्रशासकीय इमारतीला दोन एकर जागा द्यावी, असा अभिप्राय होता; परंतु पवार यांनीच दोनची पाच एकर करा, असे आदेश दिले. कोणाचे घर बांधत नाहीत, प्रशासकीय इमारत बांधायची आहे, असेही त्यांनी बजावले होते. पवार यांच्यामुळे दोनची पाच एकर जागा देण्यात आली; परंतु निधी देण्याआधीच त्यांचे विमान अपघातात निधन झाले.
शेंडापार्क येथे विविध शासकीय इमारतींची उभारणी करण्यात येत आहे. याच ठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी, तसेच भविष्यातील सर्किट बेंच आणि आयटी पार्क उभारण्यात येणार असल्यामुळे महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी हे ठिकाण अगदी योग्य म्हणावे लागेल. नव्या प्रशासकीय इमारतीत सर्व विभागांचे कामकाज एकाच छताखाली चालणार असल्यामुळे नागरिकांची सोय होणार आहे. - आमदार अमल महाडिक