Kolhapur Municipal Election 2026: दहा तास मतदान प्रक्रिया सुरू राहणार; चार सदस्य निवडण्याची प्रथमच संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 18:06 IST2026-01-06T18:06:06+5:302026-01-06T18:06:41+5:30
मतदान आणि मतमोजणी या दोन्ही टप्प्यांवरील तयारी करण्यात यंत्रणेतील सर्व कर्मचारी व्यस्त

Kolhapur Municipal Election 2026: दहा तास मतदान प्रक्रिया सुरू राहणार; चार सदस्य निवडण्याची प्रथमच संधी
कोल्हापूर : चार लाख ९४ हजार मतदार, ५९५ मतदान केंद्रे, ३०९६ कर्मचारी इतके प्रचंड नेटवर्क असलेल्या कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, दि. १५ जानेवारीला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच, अशी दहा तास मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. एकाच वेळी एका मतदाराला चार मते देण्याची संधी महापालिका निवडणुकीत प्रथमच मिळत आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेला वेळ लागण्याची शक्यता गृहित धरून पाच वाजता केंद्रावर आलेल्या सर्वांना मतदानाचा अधिकार दिला जाणार आहे.
चौसदस्य प्रभाग रचनेद्वारे कोल्हापूर महानगरापालिकेची प्रथमच निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीतील मतदानाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रचाराला आता केवळ आठ दिवस उरले असून, एकीकडे उमेदवार, समर्थकांची प्रचाराची धावपळ उडाली असताना दुसरीकडे निवडणुकीची तयारी करणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांचीही धावपळ उडाली आहे. मतदान आणि मतमोजणी या दोन्ही टप्प्यांवरील तयारी करण्यात यंत्रणेतील सर्व कर्मचारी व्यस्त आहेत. सगळी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.
या निवडणुकीत महापालिका हद्दीतील चार लाख ९४ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावून ८१ नगरसेवक निवडून देणार आहेत. मतदानासाठी ५९५ मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. तांत्रिक तपासणी करून शासकीय गोदामात ठेवण्यात आलेली इलेक्ट्रिक मतदान यंत्रे तसेच त्याची कंट्रोल युनिट आज, मंगळवारी सातही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात येत आहेत. त्यांच्या कार्यालयाकडून ती दि. १४ जानेवारी रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक यंत्रणेसह पाठविण्यात येणार आहेत.
आज कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील ५९५ मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण आज, मंगळवारी आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण सकाळी ९ ते दुपारी ११ यावेळेत सायबर कॉलेज आनंद भवन, राजारामपुरी येथील व्ही. टी. पाटील हॉल, स. म. लोहिया रामगणेश गडकरी सभागृह व राजाराम कॉलेज येथे होणार आहे. तसेच दुपारी २ ते सायंकाळी ४ या सत्रात सायबर कॉलेज आनंद भवन, स. म. लोहिया रामगणेश गडकरी सभागृह व राजाराम कॉलेज येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणादरम्यान मतदान प्रक्रियेबाबत आवश्यक मार्गदर्शन, जबाबदाऱ्या व आयोगाच्या सूचनांची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
तीन हजार मतदान कर्मचारी नियुक्त
शहरातील ५९५ मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. प्रत्येक केंद्रावर एक मतदान अधिकारी, तीन मतदान सहायक, एक शिपाई, एक पोलिस कर्मचारी यांचा समावेश राहणार आहे.
१० जानेवारीला पोस्टल मतदान
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीत सक्रिय सहभाग असलेल्या कर्मचाऱ्यांकरिता पोस्टल मतदानाचा अधिकार देण्यात आला असून हे मतदान १० व ११ जानेवारीला होणार आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक १५ जानेवारीला होत आहे. या निवडणुकीतील मतदान सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. त्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे एक विशिष्ट नमुन्यातील अर्ज भरून द्यायचा आहे. तो भरून दिल्यानंतरच त्यांना मतदान करता येईल.
आतापर्यंत ४०० कर्मचाऱ्यांनी असे अर्ज घेतला असून आज मंगळवारी होणाऱ्या प्रशिक्षण शिबिरावेळीही फॉर्म भरून घेतले जाणार आहेत. १० व ११जानेवारीला ज्या त्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात पोस्टल मतदानाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. मतदान झाल्यानंतर मतपत्रिका संबंधित कार्यालयात सील करून ठेवल्या जातील आणि त्या मतमोजणीवेळी मोजल्या जातील.