आयोगाला जाग; मतदार याद्या दुरुस्तीस मुदतवाढ, कोल्हापूर महापालिकेने केली बीएलओ, पर्यवेक्षकांची पूर्णवेळ नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 12:46 IST2025-11-27T12:45:49+5:302025-11-27T12:46:27+5:30
कर्मचारी ऑनफिल्ड लागले कामाला

आयोगाला जाग; मतदार याद्या दुरुस्तीस मुदतवाढ, कोल्हापूर महापालिकेने केली बीएलओ, पर्यवेक्षकांची पूर्णवेळ नियुक्ती
कोल्हापूर : शहरातील २० प्रभागांच्या प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीतील मोठ्या प्रमाणात चुका निदर्शनास आल्यामुळे महापालिका प्रशासन हादरून गेले असून जादा कर्मचारी नियुक्तीबरोबरच आता बीएलओ, पर्यवेक्षक यांची पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेचे सर्व कर्मचारी मतदार याद्यांच्या दुरुस्तीसाठी ‘ऑन फिल्ड’ कामाला लागले आहेत. दरम्यान, यादीतील घोळाची व्याप्ती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगानेही बुधवारी हरकती, सूचना दाखल करून घेण्याची तसेच अंतिम याद्या प्रसिद्ध करण्याची मुदत सहा दिवसांनी वाढविली आहे.
याआधीच्या कार्यक्रमानुसार शुक्रवारपर्यंत हरकती, सूचना दाखल करण्याची मुदत होती, ती आता वाढवून दि. ३ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे तसेच हरकतीवर सुनावणी घेऊन अंतिम मतदार याद्या दि. ५ डिसेंबरऐवजी १० डिसेंबरला प्रसिद्ध करायच्या आहेत.
प्रारूप मतदार याद्यातील गंभीर चुका लक्षात आल्यानंतर राजकीय पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या, त्यामुळे पालिका प्रशासनदेखील गडबडून गेले. शहरातील घराघरांपर्यंत पोहोचणारे घरफाळा, पाणीपुरवठा, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना मतदार याद्यांच्या दुरुस्तीच्या कामात समाविष्ट करून घेतले. त्यांना मतदार याद्या दुरुस्त कशा करायच्या याचे प्रशिक्षण दिले. आता सगळे कर्मचारी प्रत्यक्ष प्रभागात जाऊन हरकतींची छाननी करू लागले आहेत.
मतदार याद्यांवर दि.२५ नोव्हेंबरपर्यंत एकूण १४३ हरकती घेण्यात आल्या असून अजूनही हरकती येण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रारूप मतदार यादीतील त्रुटी अंतिम यादी प्रसिद्ध करताना स्वतःहून दुरुस्त करण्याचे अधिकार आयुक्तांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यामुळे विधानसभा मतदारसंघ क्रमांक २७६ मधील भाग १ ते ३१५ आणि मतदारसंघ क्रमांक २७४ मधील भाग १ ते १८६ साठी नियुक्त सर्व बी.एल.ओ. व पर्यवेक्षकांना दि. ४ डिसेंबरपर्यंत विभागीय कार्यालयात पूर्णवेळ उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रारूप मतदार यादीशी संबंधित कामकाजात कोणतीही दिरंगाई किंवा हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर निवडणूकविषयक कामात अडथळा आणल्याबाबत निवडणूक विभागाकडून पुढील कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.