Kolhapur: कोल्हापूर महापालिकेच्या अंदाजपत्रकात नागरी सुविधांवर भर, ९८८ कोटींचे अंदाजपत्रक जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 15:46 IST2022-03-07T15:45:58+5:302022-03-07T15:46:36+5:30
Kolhapur Municipal Corporation Budget : आर्थिक परिस्थिती बेताची तसेच उत्पन्नाचे मार्ग मर्यादित असताना सुध्दा कोल्हापूर महानगरपालिकेच्या सन २०२२-२०२३ सालातील नवीन अंदाजपत्रकात जास्तीत जास्त चांगल्या नागरी सुविधा पुरविण्याची ग्वाही देण्यात आली आहे.

Kolhapur: कोल्हापूर महापालिकेच्या अंदाजपत्रकात नागरी सुविधांवर भर, ९८८ कोटींचे अंदाजपत्रक जाहीर
कोल्हापूर : आर्थिक परिस्थिती बेताची तसेच उत्पन्नाचे मार्ग मर्यादित असताना सुध्दा कोल्हापूर महानगरपालिकेच्या सन २०२२-२०२३ सालातील नवीन अंदाजपत्रकात जास्तीत जास्त चांगल्या नागरी सुविधा पुरविण्याची ग्वाही देण्यात आली आहे. तसेच सध्या सुरु असणाऱ्या थेट पाईप लाईन योजना, अंबाबाई मंदिर परिसर विकास, पाणी पुरवठा वितरण योजना या महत्वाकांक्षी योजना नवीन वर्षात पूर्णत्वाला नेण्याचा संकल्पही करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ सुचविण्यात आलेली नाही.
कोल्हापूर महानगरपालिकेत सध्या प्रशासक राजवट सुरु असून सलग दुसऱ्या वर्षी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी महापालिकेचे नवीन वर्षाचे अंदाजपत्रक प्रशासकिय उपसमितीसमोर सादर केले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत याससंदर्भात सविस्तर माहिती दिली.
सन २०२२ - २०२३ या अर्थसंकल्पीय अंदाजात अव्वल शिल्लकेसह महसूली व भांडवली अपेक्षित जमा रुपये ६७३ कोटक्ष ७० लाख इतकी असून खर्च ६७२ कोटी ७१ लाख अपेक्षीत आहे. विशेष प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या कामांसाठी अपेक्षीत जमा २४५ कोटी ४९ लाख रुपये असून खर्च २४१ कोटी ३० लाख अपेक्षीत आहे. महिला बालकल्याण निधी व केंद्रिय वित्त आयोग यांच्याकडून ६९ काेटी १२ लाख अपेक्षित असून खर्च ६८ कोटी ९२ लाख अपेक्षित आहे. एकूण महसुली, भांडवली व वित्त आयोग मिळून एकूण ९८८ कोटी ३१ लाखाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले.