Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 13:01 IST2025-12-15T12:55:41+5:302025-12-15T13:01:39+5:30
CM Devendra Fadnavis Unveils Statue of Chhatrapati Sambhaji Maharaj: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते कोल्हापुरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले.

Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
कोल्हापुरातील इचलकरंजीतछत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. "छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण करणे हा माझ्यासाठी पुण्याचा दिवस आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आणि सांगलीत अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे. हे स्मारक जनतेचे आहे. एकीकडे शिवाजी महाराज आणि दुसरीकडे संभाजी महाराज यांचे पुतळे आपल्याला प्रेरणा देत राहतील. महाराज नसते तर हा भगवा दिसला नसता", असे फडणवीस म्हणाले.
संभाजी महाराज यांचा इतिहास दाबण्याचा प्रयत्न
स्वातंत्र्यानंतरही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास दाबण्याचा प्रयत्न झाला, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. "मुघलांच्या इतिहासाला सतरा पान होती आणि माझ्या राजाच्या इतिहासाला एक पॅरेग्राफ दिला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यात मोठा बदल केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला २१ पाने दिली. आपल्या मुलांना आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकायला मिळतो."
"तर या देशाचा इतिहास वेगळा असता…"
"औरंगजेबला वाटले की, छत्रपती शिवाजी महाराज नाहीत, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र ताब्यात घेता येईल. पण त्याला हे माहीत नव्हते की, एक छावा या ठिकाणी उभा होता. संभाजी महाराजांनी एकही लढाई हरली नाही. जर दगाफटका झाला नसता, तर या छाव्याला पकडण्याची कुणाची हिंमत झाली नसती. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी संस्कृत ग्रंथ लिहिला होता. संभाजी महाराजांसोबत दगाफटका झाला नसता, तर या देशाचा इतिहास वेगळा असता", असेही ते म्हणाले.
"भगवा शाबूत ठेवावा लागेल"
यावेळी फडणवीस यांनी उपस्थितांना एकजुटीचा संदेश दिला. "आपल्याला देखील जातीपाती तोडून एक राहावे लागेल. आपला भगवा शाबूत ठेवावा लागेल, आपले हिंदुत्व शाबूत ठेवावे लागेल. आपला हिंदुस्तान, हिंदुस्तानच राहिला पाहिजे," असे आवाहन त्यांनी केले.