Ichalkaranji Municipal Election 2026: पक्षांचे पाच तर १३ अपक्ष रिंगणात; ९ माजी नगरसेवक, ३ माजी सभापती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 17:48 IST2026-01-10T17:48:29+5:302026-01-10T17:48:52+5:30
कोण किती ताकद लावणार? त्यांच्या मतांची बेरीज-वजाबाकी विजयी उमेदवाराच्या पथ्यावर पडणार

Ichalkaranji Municipal Election 2026: पक्षांचे पाच तर १३ अपक्ष रिंगणात; ९ माजी नगरसेवक, ३ माजी सभापती
अतुल आंबी
इचलकरंजी : प्रभाग क्रमांक ७, ८, ९ मध्ये नऊ माजी नगरसेवक, तीन माजी सभापती यांच्यासह तब्बल १३ अपक्ष रिंगणात आहेत. या तीन प्रभागांत भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी, शिव-शाहू, उद्धवसेना यांच्यासह बहुजन समाज पार्टी, आप, वंचित बहुजन अशा विविध पक्षांचे उमेदवार नशीब आजमावत आहेत. त्यातील नऊ ‘ब’ मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात मैत्रीपूर्ण कुस्ती आहे.
प्रभाग ७ ‘अ’ मध्ये रेखा कांबळे आणि क्रांती आवळे यांच्यात लढत आहे. ‘ब’ मध्ये प्रमिला जावळे (भाजप), सविता स्वामी (उद्धव सेना) आणि अमृता चौगुले (शिव-शाहू), ‘क’ मध्ये कल्याण सुरवसे (शिंदेसेना), नंदकुमार पाटील (शिव-शाहू) आणि रावसो निर्मळे (वंचित बहुजन), ‘ड’ मध्ये माजी सभापती संजय केंगार विरूद्ध राष्टवादीचे गटप्रमुख तथा विधानसभेचे उमेदवार मदन कारंडे यांच्यात चुरशीची लढत असून, अशोक कांबळे (आप), प्रकाश कांबळे, जोहेब हलगले (उद्धव सेना) या तीन पक्षांच्या उमेदवारांसह तीन अपक्ष रिंगणात आहेत. यातील कोण किती ताकद लावणार? त्यांच्या मतांची बेरीज-वजाबाकी विजयी उमेदवाराच्या पथ्यावर पडणार आहे.
प्रभाग ८ ‘अ’ मध्ये माजी उपनगराध्यक्ष उदय बुगड यांच्या पत्नी रुपा बुगड (भाजप), रजनी शिरगुरे (शिव-शाहू) आणि स्नेहल मस्के (उद्धव सेना) अशी तिरंगी लढत आहे. ‘ब’ मध्ये शिव-शाहूच्या संगीता आलासे व अपक्ष माधुरी चव्हाण या दोघी माजी नगरसेविका असून, उद्धव सेनेच्या मुमताज बैरागदार आणि शिंदेसेनेच्या श्वेता मालवणकर मैदानात आहेत. ‘क’ मध्ये माजी सभापती संजय तेलनाडे हे शिव-शाहू आघाडीतून तर आवाडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे परीसनाथ उर्फ राहुल घाट हे भाजपकडून लढत आहेत. ही लक्षवेधी लढत असून, तेथे भरत घाट हे अपक्ष रिंगणात आहेत. ‘ड’ मध्ये शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने विरूद्ध संजय बेडक्याळे यांची झुंज आहे. त्यात तीन अपक्षही मैदानात आहेत.
प्रभाग ९ ‘अ’ मध्ये माजी नगरसेवक अब्राहम आवळे विरूद्ध त्यांचे चुलते रुबेन आवळे यांच्यात जोरदार लढत सुरू असून, वंचित बहुजनचे अनुष आवळे आणि दोन अपक्षही उभे आहेत. ‘ब’ मध्ये माजी नगरसेविका ध्रुवती दळवाई (भाजप), कॉँग्रेसचे शहराध्यक्ष संजय कांबळे यांची मुलगी संतोषी कांबळे (शिव-शाहू) आणि राष्टवादी अजित पवार गटाच्या उमेदवार तनुजा माने अशी तिरंगी लढत आहे. यांच्यात मतविभागणीचा दणका कोणाला बसतो, यावरच निकाल लागणार आहे. ‘क’ मध्ये मनीषा नवनाळे आणि रोहिणी बरकाळे यांच्यात एकास एक लढत आहे. ‘ड’ मध्ये माजी सभापती राहुल खंजिरे विरूद्ध उदय धातुंडे अशी टक्कर असून, त्यामध्ये आपचे वसंत कोरवी, उद्धव सेनेचे उमर शेख आणि एक अपक्ष रिंगणात आहे.
५ पक्ष ३ अपक्ष ; ८ उमेदवार रिंगणात
७ ‘ड’ मध्ये भाजप, शिव-शाहू, उद्धव सेना, बहुजन समाज पार्टी आणि आप अशा पाच पक्षांचे आणि ३ अपक्ष असे एकूण ८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या प्रभागाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
९ ‘क’मध्ये एकास एक लढत
प्रभाग ७, ८ आणि ९ या तीन्ही प्रभागांतील १२ जागांपैकी फक्त ९ ‘क’ या एकाच ठिकाणी एकास एक लढत आहे.