Shaktipeeth Highway: शेतकऱ्यांचा विरोध नसेल तर चंदगडमधून मार्ग जाण्यास हरकत काय - मंत्री मुश्रीफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 17:11 IST2025-07-04T17:08:37+5:302025-07-04T17:11:46+5:30
मुख्यमंत्र्यांनी बोलावल्यानंतर आमची भूमिका मांडू

Shaktipeeth Highway: शेतकऱ्यांचा विरोध नसेल तर चंदगडमधून मार्ग जाण्यास हरकत काय - मंत्री मुश्रीफ
कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाबाबत भूमीसंपादनाची रद्द झालेली प्रक्रिया पुनर्स्थापित करण्याबाबतच्या मुद्याला आपण व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विरोध केला होता. शक्तिपीठ महामार्ग संदर्भात आम्हाला जेव्हा मुख्यमंत्री बोलवतील तेव्हा आम्ही आमची भूमिका देखील मांडू.
जर हा महामार्ग चंदगडमधून जाण्यास तेथील शेतकऱ्यांचा विरोध नसेल तर तोदेखील मार्ग अवलंबायला काय हरकत नाही, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी कोल्हापुरात दिली.
ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणास शुभेच्छा
एका कुटुंबातील दोन भाऊ जर एकत्र येत असतील तर सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या पाहिजेत. त्यांच्या मेळाव्यासाठीही शुभेच्छा आहेत. राजकारणात काय बदल होतात? हे निवडणुकीत जनता ठरवत असते. जसे ठाकरे बंधूनी एकत्र यावे, म्हणून शुभेच्छा दिल्या तशाच दोन्ही पवारांनी एकत्र येण्याबाबतही दिल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
सीपीआर’ मृतदेह हेळसांडची चौकशी
सीपीआर रुग्णालयातील मृतदेहाच्या हेळसांडीबद्दल मला समजले आहे. आज, याबाबत संबधितांची बैठक घेत आहे. संबधित प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे प्रकार पुन्हा होणार नाहीत, याचीही काळजी घेतली जाईल, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.