Ichalkaranji Municipal Election Results 2026: इचलकरंजीत ३८ नव्या चेहऱ्यांना संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 17:44 IST2026-01-17T17:44:11+5:302026-01-17T17:44:33+5:30
इचलकरंजी : येथील महानगरपालिकेच्या पहिल्या सभागृहात काम करण्यासाठी मतदारांनी ३८ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. तसेच मागील नगरपालिका सभागृहातील ...

Ichalkaranji Municipal Election Results 2026: इचलकरंजीत ३८ नव्या चेहऱ्यांना संधी
इचलकरंजी : येथील महानगरपालिकेच्या पहिल्या सभागृहात काम करण्यासाठी मतदारांनी ३८ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. तसेच मागील नगरपालिका सभागृहातील १९ सदस्य, तर ८ माजी नगरसेवकांना पुन्हा यश मिळाले आहे.
महानगरपालिकेमध्ये प्रत्यक्षात सभागृहात आपल्या प्रभागाचे मुद्दे मांडताना अभ्यास असावा लागतो. यापूर्वी नगरपालिकेत प्रकाश मोरबाळे, सागर चाळके, सुनील पाटील, राहुल खंजिरे, शशांक बावचकर असे अनेक नगरसेवक प्रभावीपणे मुद्देसूद मांडणी करून आपले प्रतिनिधीत्व सिद्ध करत होते. त्याचबरोबर आपल्या भागातील कामे महापालिकेत कागदपत्रांसह पोहोचून ती मंजूर करून त्यासाठी निधी खेचून आणण्यासाठीही कसब लागते. प्रभावी उमेदवार विरोधक असला तरी तो सत्ताधाऱ्यांना नाकीनऊ आणतो. याची अनेकवेळा प्रचिती आली आहे.
जनतेने ३८ नव्या उमेदवारांना संधी दिली असली तरी त्या संधीचे सोने करण्यासाठी या उमेदवारांनी जुन्यांकडून अनुभव घेऊन अभ्यास करून आपले अस्तित्व सिद्ध करणे आवश्यक आहे. त्यासाठी नव्याने किती नगरसेवक तयार होतात, याची चर्चा सुरू झाली आहे.
३४ महिला, ३१ पुरूष
पहिल्या सभागृहातही महिला राज राहणार आहे. ५० टक्के आरक्षणानुसार ३३ महिला आणि ३२ पुरूष रिंगणात होते. परंतु एका खुल्या जागेवर महिला उमेदवार निवडून आल्याने त्यांची संख्या ३४ झाली आहे. त्यामुळे पुरूष ३१ निवडून आले. तसेच सध्या आयुक्तही महिलाच आहेत. अतिरिक्त आयुक्त, मुख्य लेखापरीक्षक, उपायुक्त, सहायक उपायुक्त, २ खातेप्रमुख असा प्रशासनातही महिला राज आहे.