Kolhapur: विधानसभा निवडणुकीत मीही घाबरलो होतो, पण..; मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 17:59 IST2025-05-17T17:58:21+5:302025-05-17T17:59:19+5:30

'कोणत्या जातीत जन्माला यावं हे माझ्या हातात नाही'

I was also scared during the assembly elections but, Minister Hasan Mushrif confessed | Kolhapur: विधानसभा निवडणुकीत मीही घाबरलो होतो, पण..; मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली कबुली

Kolhapur: विधानसभा निवडणुकीत मीही घाबरलो होतो, पण..; मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली कबुली

बाबासाहेब चिकोडे

कसबा सांगाव : माझ्या पराभवासाठी शेकडो प्रयत्न करण्यात आले. चार महिन्यापूर्वी झालेली विधानसभेची निवडणूक ही खास करून जातीयवादावर झाली. कोणत्या जातीत जन्माला यावं हे माझ्या हातात नाही. या निवडणुकीत मीही थोडा घाबरलो होतो. कागल मतदार संघातील गोरगरीब जनता व माजी आमदार संजय घाटगे हे माझ्या मागे उभे राहिल्याने मी विजयी झालो असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

मौजे सांगाव येथे विविध विकास कामाचा शुभारंभ व हसन मुश्रीफ यांच्या नागरी सत्कारासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळचे संचालक युवराज पाटील होते. यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, या निवडणुकीत मला काही ठिकाणी मते कमी पडली असली तरी येणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत ही उणीव भरून काढल्याशिवाय आणि महायुतीचा झेंडा फडकवल्या शिवाय राहणार नाही. ज्यांना ज्यांना शब्द दिला आहे. त्यांना बिद्रीसह अन्य ठिकाणी संधी दिली जाणार आहे. 

'ज्यांना कागद उचलून माहिती नाही, ते मुश्रीफांची बरोबरी करतायत'

माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, गेल्या ७५ वर्षात जितकी वैद्यकीय महाविद्यालये उभारली गेली नाहीत. त्याच्या दुप्पट वैद्यकीय महाविद्यालये मंत्री मुश्रीफ यांनी गत अडीच वर्षात उभारली आहेत. राज्यात अव्वल दर्जाची महाविद्यालये, हॉस्पिटल्स उभारण्याचा ध्यास मुश्रीफ यांचा आहे. ज्यांना कागद उचलून माहित नाही अशी माणसं मुश्रीफ यांची बरोबरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. विधानसभा निवडणुकीत मोठा जातियवाद झाला नसता तर मुश्रीफ किमान पन्नास हजार मतांनी निवडून आले असते. त्यांना साथ देणे म्हणजे विकासाला साथ देण होय असे ते शेवटी म्हणाले. 

यावेळी भैय्या माने, युवराज पाटील, शितल फराकटे यांची भाषणे झाली. कार्यक्रमास मौजे सांगाव चे सरपंच विजयसिंह पाटील, प्रवीणसिंह भोसले, प्रकाश गाडेकर, रंगराव पाटील, गोरख कांबळे, मनोज फराकटे, हिंदुराव मगदूम, आदीसह मौजे सांगाव ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, कार्यकर्ते, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एन. डी. पाटील यांनी स्वागत केले, किरण पास्ते यांनी प्रास्ताविक केले, के एस पाटील यांनी सूत्रसंचालन केले, धीरज कांबळे यांनी आभार मानले.

भैय्या मानेंना आमदार करणार - मुश्रीफ

मंत्री मुश्रीफ यांनी अनेक कार्यकर्त्यांना विविध पदावर संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. आता पदवीधर मतदार संघात भैय्या माने यांना संधी देऊन आमदार करणार आहोत. मतदार नोंदणीसाठी कामाला लागा. दोन वेळा ही जागा भाजपने घेतली होती. लहान भाऊ म्हणून आता राष्ट्रवादीचा नंबर आहे असे मुश्रीफ यांनी यावेळी जाहीर केले. 

Web Title: I was also scared during the assembly elections but, Minister Hasan Mushrif confessed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.