Kolhapur: इचलकरंजीत चांगला रस्ता प्रस्तावित कामांच्या यादीत, चूक लक्षात येताच निधी अन्य कामांसाठी वर्ग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 18:13 IST2025-03-06T18:12:51+5:302025-03-06T18:13:15+5:30
अतुल आंबी इचलकरंजी : नगरोत्थान महाअभियानांतर्गत शहरातील रस्त्यांसाठी ५२ कोटीं निधी मंजूर झाला आहे. पैकी २५ लाख ५५ हजार ...

संग्रहित छाया
अतुल आंबी
इचलकरंजी : नगरोत्थान महाअभियानांतर्गत शहरातील रस्त्यांसाठी ५२ कोटीं निधी मंजूर झाला आहे. पैकी २५ लाख ५५ हजार ६६६ रुपये निधी मंजूर झालेला एक रस्ता सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तो निधी त्या भागातील अन्य अंतर्गत पाच रस्त्यांसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकारामुळे या योजनेतून मंजूर केलेल्या अन्य रस्त्यांचीही शहानिशा करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
शहरातील रस्त्यांसाठी मंजूर झालेला ५२ कोटी निधी सार्वजनिक बांधकामाकडे वर्ग करून त्यांच्यामार्फत कामे सुरू आहेत. त्यातील काही रस्त्यांच्या दर्जाबाबत तक्रारीही झाल्या आहेत. परंतु, त्याची दखल न घेता कामे सुरूच आहेत. त्यात बरगाले कॉटन ते हनुमान मंदिर रस्ता डांबरीकरणासाठी २५ लाख ५५ हजार ६६६ रुपये निधी मंजूर झाला होता. प्रत्यक्षात हा रस्ता चांगलाच असल्याचे लक्षात आल्याने हे काम थांबले.
सुस्थितीतील रस्ता पुन्हा करण्याऐवजी त्या भागातील अंतर्गत अन्य पाच रस्त्यांसाठी हा निधी वापरण्याचा निर्णय महापालिका प्रशासकाने ठराव करून घेतला आहे. तसे त्यांनी ३ मार्चला सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवला आहे. चांगला रस्ता पुन्हा करून निधीचा अपव्यय टाळण्यासाठी हा चांगला निर्णय आहे. परंतु, रस्ते मंजुरीसाठी पाठविताना त्याची शहानिशा न करताच प्रस्ताव पाठविल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
ही नवी कामे होणार
- रुपाली ज्वेलर्स ते भागीरथी ज्वेलर्स/बी ॲंड बी टायर कंपनीपर्यंत दक्षिणोत्तर रस्ता. एकूण लांबी (मीटर) १३५. अंदाजित रक्कम ५८१३३०.
- गंगा शुद्ध पेयजल/ईझी मोबाइल, कैलास उरणे घर ते कालीक साऊंड सिस्टीम सचिन सुतार घर, बी. एम. पाटील घरापर्यंतचा दक्षिणोत्तर रस्ता. एकूण लांबी (मीटर) १३०. अंदाजित रक्कम ५४२४६०.
- वीरशैव बॅँक (मेन रोड) ते पोतदार ज्वेलर्स, बळवंत सुतार घर, विश्वकर्मा बिल्डींगपर्यंतचा पूर्व-पश्चिम रस्ता. एकूण लांबी (मीटर) १६५. अंदाजित रक्कम ४२२९३०.
- सुरेश फोटो स्टुडिओ/हरीश असोसिएटस ते बिडला माजी नगरसेवक रुपचंद शहा घर, विजय लोखंडे घर पूर्व-पश्चिम रस्ता. एकूण लांबी (मीटर) ६५. अंदाजित रक्कम ३००७६०.
- उरणे घर/आमणे घर ते मेन रोडपर्यंत सुरज बर्थ डे शॉपीपर्यंतचा श्रीराम मंदिरसमोरील रस्ता. एकूण लांबी (मीटर) ११५. अंदाजित रक्कम ६६७६९०. एकूण - २५१५१७०.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारितील कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जाणीवपूर्वक वर्ग केली आहेत. एकूणच मनमानी कारभार सुरू आहे. शहरातील सुस्थितीतील रस्ता मंजुरीसाठी पाठविणाऱ्या संबंधितांवर कारवाई व्हावी. तसेच, या योजनेतील मंजूर असलेल्या सर्व कामांची चौकशी करावी. - शशांक बावचकर, कॉंग्रेस प्रदेश सचिव