देखाव्यातून होणार मतदानाचा जागर, निवडणूक विभागातर्फे गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 17:27 IST2023-08-11T17:27:24+5:302023-08-11T17:27:52+5:30
स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष

देखाव्यातून होणार मतदानाचा जागर, निवडणूक विभागातर्फे गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धा
कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा वारसा जपत निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने ' माझा गणेशोत्सव माझा मताधिकार ' या विषयावर गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धा होत आहे. स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबरच वैयक्तिकरीत्या ही नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी केले.
स्पर्धेत मंडळांनी देखावे व सजावटीतून मतदार नोंदणी, मताधिकार, दुबार नावे वगळणे, ओळखपत्राला आधार कार्ड जोडणे, मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यांसारख्या विषयांवर आपल्या देखावा सजावटीतून जागृती करता येऊ शकते.
बक्षिसे अशी
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी १ लाख रुपये, ५१ हजार व २१ हजार व उत्तेजनार्थ १० हजाराची अशी १० बक्षिसे दिली जाणार आहेत. सप्टेंबरमध्ये सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवाची स्पर्धा जाहीर होईल. त्यावेळी स्पर्धेची सविस्तर माहिती दिली जाईल.