Kolhapur Municipal Election 2026: माजी नगरसेवकांसह तिघा उमेदवारांचे अर्ज दाखल, ए बी फॉर्म मंगळवारीच मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 19:28 IST2025-12-25T19:27:34+5:302025-12-25T19:28:57+5:30
५३६ नामनिर्देशनपत्रांची विक्री

Kolhapur Municipal Election 2026: माजी नगरसेवकांसह तिघा उमेदवारांचे अर्ज दाखल, ए बी फॉर्म मंगळवारीच मिळणार
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी एका माजी नगरसेवकासह तीन उमेदवारांनी त्यांची नामनिर्देशनपत्रे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केली तर ५३६ नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली. आतापर्यंत १०४६ नामनिर्देशनपत्रांची विक्री झाल्याचे सांगण्यात आले. आज, गुरुवारी नाताळनिमित्त सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्रे भरता येणार नाहीत.
कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक दि. १५ जानेवारीला होत आहे. त्यासाठी मंगळवारपासून नामनिर्देशनपत्रे भरण्यास सुरवात झाली. मंगळवारी ५१० नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली, पण एकाही उमेदवाराने ते भरले नाही. बुधवारी मात्र तीन नामनिर्देशनपत्रे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल झाली. माजी नगरसेवक विजय बाबूराव साळोखे यांनी प्रभाग क्रमांक ७ ‘ड’ मधून, राहुल विठ्ठल सोनटक्के यांनी प्रभाग क्रमांक १६ ‘ड’ मधून अपक्ष म्हणून तर लोकराज्य जनता पार्टीच्या संजय भिकाजी मागाडे यांनी प्रभाग क्रमांक १७ ‘ड’ मधून नामनिर्देशनपत्र दाखल केले. जरी तिघांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले असले तरी नामनिर्देशनपत्रांची विक्री मात्र सलग दुसऱ्या दिवशीही मोठ्या संख्येने झाली.
ए बी फॉर्म मंगळवारीच मिळणार
आज, गुरुवारी नाताळनिमित्त सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्रे भरता येणार नाहीत. परंतु प्रशासकीय कामकाज सुरू राहणार आहे. शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस मोठ्या संख्येने नामनिर्देशनपत्रे दाखल होतील, अशी अपेक्षा आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे ही साेमवार किंवा मंगळवारी दाखल होण्याची शक्यता आहे. बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांना मंगळवारीच ए बी फॉर्म दिले जाण्याची शक्यता आहे.
मतदान जागृतीसाठी स्पर्धा
मतदान जागृती करण्याकरिता महापालिका प्रशासनाकडून फिल्म व रिल्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत ज्यांना भाग घ्यायचा आहे. त्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत फिल्म व रिल्स सादर करायची आहेत. मतदान जागृती करणारे व्हीडिओ पालिका प्रशासनही तयार करणार आहे. ही माहिती उपायुक्त किरणकुमार धनावडे यांनी पत्रकारांना दिली.
फेसबुक, इन्स्टाग्रामवर मिम्स
महापालिका मतदान जागृतीसाठी सोशल मीडियाचा वापर करून घेणार आहे. महापालिकेने एक क्युआर कोडही दिला आहे. तो सेव्ह करून त्यावर निवडणुकीविषयी माहिती मिळणार आहे. नागरिकांना दहा प्रश्नाच्या माध्यमातून ही माहिती दिली जाणार आहे.
टपाली मतदान फक्त कर्मचाऱ्यांसाठी
या निवडणुकीत मतदान प्रक्रियेत काम करणाऱ्या आणि शहरातील रहिवाशी असलेल्या कर्मचाऱ्यांनाच टपाली मतदान करण्याचा अधिकार मिळणार आहे. नोकरीनिमित्त बाहेरगावी असणाऱ्यांना हा अधिकार असणार नाही. त्यांनी केंद्रावर येऊनच मतदान करायचे आहे, असे उपायुक्त धनावडे यांनी सांगितले.