घराची भिंत अंगावर कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू, राधानगरी तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 16:46 IST2022-02-18T16:45:11+5:302022-02-18T16:46:34+5:30
वीस फुट उंचीची भिंत त्यांच्या अंगावर कोसळल्याने जाधव हे दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.

घराची भिंत अंगावर कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू, राधानगरी तालुक्यातील घटना
आमाजाई व्हरवडे : जुन्या घराची भिंत कोसळून एका शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. राधानगरी तालुक्यातील आणाजे गावात ही घटना घडली. आनंदा ज्ञानू जाधव (वय ६५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत माहिती अशी की, आंनदा जाधव यांनी घराच्या बांधकामासाठी आठ दिवसापूर्वी घराच्या लहान भिंती काढण्याचे काम सुरु केले होते. आज मुख्य घर पाडून जागा रिकामी करण्यासाठी गावतीलच आठ दहा लोक येणार होते.
त्यामुळे घरातील साहित्य कुठे ठेवायचे हे पाहात असताना अचानक मध्यभागी असणारी वीस फुट उंचीची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. यात जाधव हे दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. लोकांनी मदत कार्य करुन त्यांना बाहेर काढले. उपचारासाठी कोल्हापूरला घेवून जात असाताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
शवविच्छेदनासाठी त्यांना सोंळाकूर येथे ग्रामीण रुग्णालयात नेले व शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात दिला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली असून पुढील तपास राधानगरी पोलीस करीत आहेत.