Kolhapur Municipal Election 2026: ईर्ष्या दिसली, पहिल्याच दिवशी ५१० अर्जांची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 15:46 IST2025-12-24T15:44:08+5:302025-12-24T15:46:33+5:30
मतदान यंत्रे पुढील आठवड्यात येणार

Kolhapur Municipal Election 2026: ईर्ष्या दिसली, पहिल्याच दिवशी ५१० अर्जांची विक्री
कोल्हापूर : विविध कारणांमुळे गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली, नामनिर्देशनपत्र भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज प्राप्त झाला नसला, तरी एका दिवसात ५१० नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली. नामनिर्देशनपत्रांच्या विक्रीचा हा आकडा निवडणुकीतील ईर्ष्या स्पष्ट करणारा आहे.
दरम्यान, प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सुद्धा निवडणूक कामकाजात सहभागी न झालेल्या ५० कर्मचाऱ्यांना निलंबन का करू नये, म्हणून प्रशासकांनी नोटीस काढल्या आहेत. महापालिकेची १५ जानेवारीस निवडणूक आणि १६ ला मतमोजणी होणार आहे.
सकाळी अकरा वाजल्यापासून निवडणूक यंत्रणा सक्रिय झाली. पहिलाच दिवस उत्सुकतेचा, माहिती घेण्याचा ठरला. शहरातील सात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात नागरिकांनी गर्दी केली. इच्छुक उमेदवार व त्यांचे समर्थक निवडणूक कार्यालयात उत्सुकतेपोटी विविध प्रकारची माहिती विचारत होते, तसेच नामनिर्देशनपत्रांची खरेदी करत होते. एकेक व्यक्ती चार-चार नामनिर्देशनपत्रे घेत असल्याचे पाहायला मिळाले.
प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात वेगवेगळी टेबल ठेऊन त्याठिकाणी मतदान केंद्रनिहाय यादी, नामनिर्देशनत्रांची विक्री, नाहरकत दाखले देण्यासाठी एक खिडकी, जात पडताळणी प्रमाणपत्र पडताळणीसाठी फॉर्म क्रमांक १५ ए देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नामनिर्देशनपत्रांची किती विक्री झाली, यासह प्राप्त होणाऱ्या नामनिर्देशनपत्रांची नोंदी ठेवण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. नामनिर्देशनपत्रांचे शुल्क, तसेच अनामत रक्कम स्वीकारण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सर्व कार्यालये संगणकीय यंत्रणेसह सज्ज आहेत.
कसा आहे अर्ज ?
शंभर रुपयांना दिला जाणार ३७ पानांचा हा अर्ज आहे. त्यात संबंधित उमेदवाराने स्वत:ची सर्व माहिती भरायची आहे, शपथपत्र तसेच मालमत्तेची माहितीही याच अर्जातून द्यायची आहे.
कार्यालयाचे नाव - नामनिर्देशनपत्रांची विक्री
१. महासैनिक प्रशिक्षण केंद्र, लाइन बाजार - ८१
२. व्ही. टी. पाटील सभागृह, राजारामपुरी - ४६
३. दुधाळी पॅव्हेलियन - ७२
४. राजोपाध्ये बॅडमिंटन हॉल - ६६
५. गांधी मैदान कार्यालय - ५६
६. शहाजी कॉलेज सभागृह - १३१
७. मेजर ध्यानचंद हॉक स्टेडियम - ५८
एकूण अर्जांची विक्री - ५१०
मतदान केंद्र कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
महानगरपालिका निवडणुकीसाठी शहरात ५८४ मतदान केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. या केंद्रावर एकूण ३०३६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून मंगळवारी त्यांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले. सर्व कर्मचाऱ्यांना मतदानासंबंधी येत्या रविवारी (दि. २८ डिसेंबर) प्रशिक्षण दिले जाणार आहे. व्ही. टी. पाटील सभागृह, गडकरी हॉल, विवकानंद कॉलेज हॉल, राजाराम कॉलेज हॉल येथे दिवसभर हे प्रशिक्षण सुरू राहणार आहे.
५० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
निवडणुकीचे प्रत्यक्ष कामकाज सुरू झाले, तरी नेमून दिलेल्या ठिकाणी कामावर हजर न राहिल्याबद्दल मंगळवारी ५० कर्मचाऱ्यांना प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी कारणे दाखवा नोटीस दिली. आपणास निलंबित का करू नये, अशी विचारणा करतानाच चोवीस तासांत खुलासा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. जे कर्मचारी खुलासा देऊन कामावर हजर होणार नाहीत, अशांवर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे.
मतदान यंत्रे पुढील आठवड्यात येणार
निवडणुकीसाठी महापालिका प्रशासकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ६५० मतदान यंत्रांची मागणी केली आहे. ती पुढील आठवड्यात मिळतील असे सांगण्यात आले. यंत्रे ताब्यात येताच ती वापरण्यास योग्य आहेत की नाही यांची प्रत्यक्ष खात्री करून घेण्याचे काम तत्काळ सुरू केले जाणार आहे.
चार दिवसांत १८ लाखांचा भरणा
नामनिर्देशनपत्र भरताना संबंधित उमेदवारास महापालिकेचे कोणतेही देणे लागत नाही, असा ना हरकत दाखला सादर करावा लागणार आहे. गेल्या तीन-चार दिवसांत अशा देण्यापोटी १८ लाखांच्यावर महसूल जमा झाला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रशासकांच्या कार्यालयांना भेटी
प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी निवडणुकीसाठी नामनिर्देशपत्रे भरण्यास सुरुवात झाल्यानिमित्ताने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी होते.
आणखी ५०० नामनिर्देशनपत्रे छापणार
प्रशानाने १५०० नामनिर्देशनपत्रे छापली आहेत, परंतु पहिल्याच दिवशी ५१० अर्जांची विक्री झाल्याने आणखी जादा ५०० नामनिर्देशनपत्रे छापून घेण्यात येणार आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.