Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत शिव-शाहू आघाडीला झटका; आप, स्वाभिमानी पक्ष बाहेर पडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 18:10 IST2025-12-27T18:08:14+5:302025-12-27T18:10:58+5:30
जागा वाटपावरून शेवटपर्यंत झुलवत ठेवले

Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत शिव-शाहू आघाडीला झटका; आप, स्वाभिमानी पक्ष बाहेर पडले
इचलकरंजी : महानगरपालिका निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत एकमत न झाल्याने शिव-शाहू आघाडीतून आम आदमी पार्टी आणि स्वाभिमानी पक्ष बाहेर पडले असून आता हे दोन्ही पक्ष वंचित बहुजन आघाडीसह समविचारी पक्षांना सोबत घेऊन इचलकरंजी परिवर्तन आघाडीची स्थापना केली आहे. अशी माहिती स्वाभिमानी पक्षाचे शहराध्यक्ष हेमंत वणकुंद्रे आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आर्थिक निकषावरून उमेदवारी निश्चित केली जात असल्याचा आरोप करीत इचलकरंजी परिवर्तन आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीत आणखी समविचारी पक्ष, संघटनांना सामावुन घेऊन महापालिकेच्या सर्व ६५ जागा लढवणार आहे. प्रचार प्रमुख प्रकाश सुतार यांनी जागा वाटपावरून शेवटपर्यंत झुलवत ठेवले.
आत्तापर्यंत हेवेदावे विसरुन महाविकास आघाडीसोबत काम करत होतो. मात्र महापालिका निवडणुकीत जागा वाटपावर एकमत होत नसल्याने शिव-शाहु आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. धनशक्ती विरोधात जनशक्तीचा लढा उभा करु. असे पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी महेश कांबळे, राजाराम माळगे, रावसो पाटील, वसंत कोरवी, आशपाक देसाई, सलिम शेख, संदिप कांबळे उपस्थित होते.
उद्धव सेना आणि मनसेची आज बैठक
शिव-शाहू विकास आघाडीतील जागा वाटपातील तिढा वाढत चालला आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आपने साथ सोडली. त्यापाठोपाठ उद्धव सेना आणि मनसेने ही आज शनिवारी बैठक ठेवली आहे. त्यामध्ये त्यांची भूमिका स्पष्ट केली जाणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या भूमिकेकडे इच्छुकांचे तसेच शहरवासियांचे लक्ष लागले आहे.