Kolhapur Municipal Election: मनपाची मतदार यादी वादग्रस्त; चार प्रभागातील मतदार दुसऱ्याच प्रभागात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 16:36 IST2025-11-24T16:34:04+5:302025-11-24T16:36:21+5:30
गठ्ठा मतदारांची आदला, बदल; एका दिवसांत ३० हरकती : निवडणूक प्रशासनातर्फे पडताळणी सुरू

Kolhapur Municipal Election: मनपाची मतदार यादी वादग्रस्त; चार प्रभागातील मतदार दुसऱ्याच प्रभागात
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी प्रसिध्द झालेल्या प्रारूप मतदार यादीतील मतदार एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेल्याचे अनेक प्रकार समोर आल्यामुळे ही प्रारूप यादी वादग्रस्त बनली आहे. परिणामी यादीवर हरकतीची संख्या वाढत चालली आहे. रविवारी एका दिवसात तब्बल ३० आणि आतापर्यंत एकूण ३८ हरकती दाखल झाल्या आहेत. महापालिका निवडणूक यंत्रणाही यादीची पडताळणी करीत आहे. यादी तयार करण्यास कमी वेळ लागल्याने त्रुटी राहिल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द झाली आहे. यावर हरकती दाखल होत आहेत. गुरुवार अखेर हरकती दाखल करण्याची मुदत आहे. मात्र आतापर्यंत यादीतील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. एक हजार मतदार एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेल्याचे समोर आले आहे. प्रभाग एकमधील सुमारे ८०० ते एक हजार मतदारांची नावे प्रभाग क्रमांक दोनमध्ये समावेश केली आहेत.
प्रभाग क्रमांक १८ मधील मतदारांची नावे प्रभाग क्रमांक १५ आणि १६ मध्ये बेकायदेशीरपणे घातल्याचा आरोप माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी केला आहे. या तक्रारीचे पत्र त्यांनी प्रशासनास दिले आहे. याप्रकरणी केंद्र स्तरीय अधिकारी किरण मुळे, श्रीकांत देवकर, अरुण गुजर, सहायक आयुक्त संजय सरनाईक यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
प्रभाग क्रमांक एकमध्ये...
प्रभाग क्रमांक पाच मधील ११०० मतदारांची नावे प्रभाग एक मध्ये गेली होती. ती सर्व नावे परत प्रभाग क्रमांक पाचमध्ये समाविष्ट केली आहेत. सहाय्यक आयुक्त आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रभाग क्रमांक एकमधील कसबा बावड्यात येऊन पाहणी करत याबाबत कार्यवाही केली.
गठ्ठा मतदारांची आदला, बदल
काहीही संबंध नसलेल्या प्रभागात गठ्ठा मतदारांची आदला, बदल झाल्याचे समोर आले आहे. प्रभागातील सीमेलगतच्या मतदारांची अदला, बदल अधिक झाली आहे. निवडणूक रिंगणात येऊ इच्छिणारे यावर आक्षेप घेत आहेत.
राजकीय हस्तक्षेप?
मतदार यादीतील घोळ राजकीय हस्तक्षेपामुळे झाल्याचा आरोप होत आहे. काही इच्छुकांनी आपल्या हक्काचे मतदार आपण निवडणूक लढवणाऱ्या प्रभागात समाविष्ट करून घेतल्याचीही चर्चा आहे.