Ichalkaranji Municipal Election 2026: उच्चशिक्षितांनाही लागले राजकारणाचे वेध; डॉक्टर ते वकील... आजमावत आहेत नशीब
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 13:25 IST2026-01-05T13:23:30+5:302026-01-05T13:25:16+5:30
कोट्यवधी रुपयांची संपत्ती

Ichalkaranji Municipal Election 2026: उच्चशिक्षितांनाही लागले राजकारणाचे वेध; डॉक्टर ते वकील... आजमावत आहेत नशीब
अरुण काशीद
इचलकरंजी : महापालिकेच्या निवडणुकीत डॉक्टरांपासूनवकिलांपर्यंत उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. उच्चविद्याविभूषित असलेल्या आणि युवा चेहरे निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत.
महापालिकेच्या स्थापनेनंतर होणाऱ्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अनेक उच्चविद्याविभूषित व्यक्ती निवडणुकीत उतरले आहेत. डॉक्टर, वकील, अभियंते, उद्योजक, व्यापारीपासून ते शेतकऱ्यांपर्यंतच्या व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे एमबीए तसेच अभियंत्याचे शिक्षण घेतलेल्या व्यक्ती राजकारणात येऊ इच्छित आहेत. त्यांना विविध राजकीय पक्षांनी व आघाडीने उमेदवारी दिली आहे.
वाचा : इचलकरंजीत ५ प्रभागांत हाय व्होल्टेज लढती
ज्यांना उमेदवारी मिळालेली नाही, ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहेत. याबरोबरच या निवडणुकीत माजी नगराध्यक्षा अलका स्वामी व माजी आमदार तथा माजी नगराध्यक्ष अशोकराव जांभळे हेही उतरले आहेत. जसे उच्च शिक्षण घेतलेले व्यक्ती रिंगणात आहेत, तसेच विविध गुन्हे दाखल असलेली व्यक्तीही निवडणुकीला सामोरे जात आहेत.
कोट्यवधी रुपयांची संपत्ती
निवडणुकीस उभे राहिलेल्या अनेक उमेदवारांची मालमत्ताही कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे, तशी त्यांनी माहिती आपल्या शपथपत्रामध्ये निवडणूक अर्जासोबत दिली आहे. गरिबांपासून श्रीमंतापर्यंतच्या व्यक्ती उमेदवाराच्या रूपाने जनतेसमोर जात आहेत.
डझनभर उपनगराध्यक्ष
निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या आणि तीन ते चारवेळा आपली कारकीर्द पूर्ण केलेल्या अनुभवी उमेदवारांबरोबरच उपनगराध्यक्षपद सांभाळलेले डझनभर उमेदवारही पुन्हा आपले नशीब अनुभवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
पर्याय म्हणून महिलांना उमेदवारी
अनेक वर्षे राजकारण केलेल्या व्यक्तीही पक्षाकडे उमेदवारी मागत होते. मात्र, आरक्षणामुळे त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे गृहिणीपासून स्वतंत्र व्यवसाय सांभाळणाऱ्या आपल्याच कुटुंबातील महिलांना उमेदवारी मिळवून घेऊन त्या राजकीय व्यक्ती पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहेत.