Kolhapur News: दाजीपूर ते राधानगरी रस्ता १ एप्रिलपासून बंद, 'या' मार्गाने वळविण्यात आली वाहतूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 14:26 IST2023-03-24T14:26:15+5:302023-03-24T14:26:43+5:30
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आदेश

Kolhapur News: दाजीपूर ते राधानगरी रस्ता १ एप्रिलपासून बंद, 'या' मार्गाने वळविण्यात आली वाहतूक
कोल्हापूर : देवगड-निपाणी-कलादगी रस्त्याचे हायब्रीड ॲन्युटी योजनेंतर्गत रुंदीकरण, डांबरीकरण, काँक्रिटीकरण, लहान पुलांच्या पुनर्बांधणीचे काम १ एप्रिल ते ३१ मेदरम्यान करण्यात येणार आहे. या कालावधीत दाजीपूर ते राधानगरी रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करून वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी दिले.
हलक्या व लहान वाहनांसाठी बालिंगा-महेपाटी कोते-धामोड-शिरगाव-तारळे पडळी-कारीवडे-दाजीपूर-ओलवण प्रतिमा क्र. २९चा वापर करावा. मुदाळतिट्टा मार्गे येणारी हलकी व लहान वाहने सरवडे-सोळांकूर-राधानगरी (स्वरूप लॉज जवळून) राधानगरी महाविद्यालय-पिरळ पूल-मार्ग प्रजिमा २९ वरून वळवली जातील.
कोकणातील वाहने फोंडा घाट-दाजीपूर-कारीवडे-पडळी-पिरळ पूल-राधानगरी या मार्गाने वळवावीत. तसेच अवजड व मोठी वाहतूक रस्त्यावरून पूर्णपणे बंद केली जाणार आहेत. कोकणातून कोल्हापूरकडे येणारी अवजड वाहने फोंडा-कणकवली फाटा-नांदगाव-तरेळे वैभववाडी-गगनबावडा मार्गे कोल्हापूर अशी वळविण्यात येत आहे.
कर्नाटकातून येणारी अवजड वाहने कोकणामध्ये जाण्यासाठी मुदाळतिट्टा-आजरा-आंबोली-सावंतवाडी अशी वळविण्यात येत आहेत. तरी नागरिकांच्या व वाहनचालकांच्या माहितीसाठी योग्य ठिकाणी दिशाचिन्हे व माहितीसारख्या उपाययोजना पोलिस अधीक्षक, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम, कोल्हापूर व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कराव्यात, असेही त्यांनी आदेशात म्हटले आहे.