Vidhan Sabha Election 2024: उमेदवार दक्ष, केवळ व्हॉट्सॲपवर संवाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 18:02 IST2024-11-18T18:01:47+5:302024-11-18T18:02:09+5:30
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेची कारवाई टाळता यावी, म्हणून उमेदवार, तसेच प्रमुख राजकीय पक्षांनी विशेष खबरदारी घेतली आहे. प्रचार ...

Vidhan Sabha Election 2024: उमेदवार दक्ष, केवळ व्हॉट्सॲपवर संवाद
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेची कारवाई टाळता यावी, म्हणून उमेदवार, तसेच प्रमुख राजकीय पक्षांनी विशेष खबरदारी घेतली आहे. प्रचार करण्यासाठी सध्या सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्याचा जसा फायदा होतो, तसाच तोटाही होत आहे, यासाठी निवडणूक विभाग आणि पोलिस विभाग दक्ष असून, त्यासाठी दक्षता पथकही नेमलेले आहे. सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम असले, तरी त्यामुळे उमेदवार किंवा पक्ष अडचणीत येऊ शकतो, हे जाणून उमेदवार संवाद साधण्यासाठी प्रचंड काळजी घेत आहेत. ‘निरोप’ पोहचले नाहीत तरी चालतील, पण व्हॉट्सॲप कॉलशिवाय बोलणे नकोच, अशी त्यांनी सावध भूमिका घेतली आहे.
सोशल मीडियावरील फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, एक्स, स्नॅपचॅट यांसारखी साधने निवडणुकीत मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत. या माध्यमातून थेट प्रचार होत असला, तरी सर्वसामान्य मतदार मात्र व्हॉट्सॲपवर अधिक दिसून येतो. त्यामुळे हेच माध्यम अधिकतर वापरले जात आहेत. मात्र, मोबाइलवरून साधलेला संवाद व्हायरल होत असल्याने अनेक नेते अडचणीत आल्याची उदाहरणे आहेत.
मुद्दाम प्रश्न उपस्थित करून बोलण्याच्या ओघात भलताच प्रश्न विचारून उमेदवाराला तोंडघशी पाडायचे आणि तो संवाद व्हायरल करण्याचा प्रकार काही उमेदवारांबाबत घडला, म्हणून सर्वच पक्ष आणि त्यांचे उमेदवार प्रचार काळात व्हॉट्सॲपवरून कॉल करू लागले आहेत. आता राजकीय घडामोडीवर प्रतिक्रिया द्यायची झाल्यास उमेदवार म्हणतो, थांबा व्हॉट्सॲप कॉल करतो. तंत्रस्नेही नसलेले त्यांचे पी.ए.कडून असा कॉल लावून घेत बोलत आहेत.
मोबाइलवर बोलणे बंद
चांगल्या माहितीपेक्षा खोटी माहिती वेगाने पसरत असल्यामुळे सोशल मीडियावरची राजकीय वादावादी रंगत आहे. आता ॲडमिनपण पटकन चुकीची टीका डिलीट करीत खबरदारी घेत आहेत, पण सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार विशेष खबरदारी घेत आहेत. मोबाइलवर बोलणे बंद आणि ओन्ली व्हॉट्सॲप हाच संवादासाठी सोईचा मार्ग ठरला आहे.