परवानगी घेण्याआधीच कोल्हापुरात मंडळांनी थाटले मंडप; लेझर शो, डीजेला बंदीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 17:17 IST2025-08-20T17:16:45+5:302025-08-20T17:17:23+5:30

दीडशे मंडळांवर खटल्यांची प्रक्रिया

Bands set up pavilions in Kolhapur even before getting permission Laser shows, DJ banned | परवानगी घेण्याआधीच कोल्हापुरात मंडळांनी थाटले मंडप; लेझर शो, डीजेला बंदीच

संग्रहित छाया

कोल्हापूर : गणेशोत्सव अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपला तरी अजूनही अनेक मंडळांनी पोलिसांकडून मंडपांना परवानगी घेतलेली नाही. विनापरवानगी मंडप थाटण्याचे काम सुरू आहे. शहर पोलिस उपअधीक्षक कार्यालयात एक खिडकी योजना सुरू केल्यापासून ४८४ अर्ज मंडळांनी घेतले. यातील केवळ ३१३ मंडळांनी अर्ज भरून पोलिसांकडून मंडपांना परवानगी घेतली आहे. त्यामुळे विनापरवानगी मंडपांचा प्रश्न गंभीर होण्याआधीच पोलिसांना खबरदारी घ्यावी लागणार आहे.

गेल्यावर्षी शहरातील ८८४ गणेशोत्सव मंडळांनी शहर पोलिस उपअधीक्षक कार्यालयातील एक खिडकी योजनेत नोंदणी करून मंडपांना परवानगी घेतली होती. मंडळांना नोंदणीसाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी यंदा पोलिसांनी ६ ऑगस्टपासून एक खिडकी योजना सुरू केली आहे. यातून शहरातील ४८४ मंडळांनी अर्ज घेतले. यापैकी केवळ ३१३ मंडळांनी अर्ज भरून मंडपांना परवानगी घेतली. 

प्रत्यक्षात मात्र शहरात अनेक ठिकाणी मंडपाचे काम गतीने सुरू आहे. खड्डे काढण्याचे शुल्क भरण्याआधीच मंडप उभे राहत आहेत. काही मंडळांनी मोठ्या आकाराचे मंडप उभारून रस्ते अडविले आहेत. अशा मंडळांची तपासणी करणे आवश्यक आहे. अन्यथा पोलिस आणि महापालिकेने जाहीर केलेली नियमावली कागदावरच राहण्याचा धोका आहे.

लेझर शो, डीजेला बंदीच

मिरवणुकांमध्ये लेझर शो आणि मोठ्या आवाजातील डीजेला बंदीच आहे. आगमन मिरवणुकीवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. लेझरचा वापर केल्यास संबंधित लेझर यंत्रणा जागेवर जप्त केली जाईल. तसेच ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या डीजेवरही कारवाई करण्याचा इशारा शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी दिला आहे.

दीडशे मंडळांवर खटल्यांची प्रक्रिया

गेल्यावर्षी शहरातील मिरवणुकांमध्ये लेझरचा वापर झाला नाही, त्यामुळे कारवाया झाल्या नाहीत. असे पोलिसांनी सांगितले. मात्र, २०२३ मध्ये डीजेचा दणदणाट केलेल्या ११६ मंडळांवर न्यायालयात खटले दाखल केले आहेत. तसेच गेल्यावर्षी ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केलेल्या १५० मंडळांना नोटिसा पाठविल्या असून, त्यांच्यावर न्यायालयात खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहरातील सर्व मंडळांनी परवानगी घेऊनच मंडप उभे करावेत. विनापरवानगी मंडपांचा शोध घेऊन मंडळांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना सर्व पोलिस ठाण्यांना दिल्या आहेत. मंडळांनी कारवाई ओढवून घेऊ नये. -प्रिया पाटील, शहर पोलिस उपअधीक्षक

Web Title: Bands set up pavilions in Kolhapur even before getting permission Laser shows, DJ banned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.