Municipal Corporation Election: कोल्हापूर शहरात १९ हजार मतदारांचा पत्ता सापडेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 12:07 IST2025-11-26T12:07:35+5:302025-11-26T12:07:45+5:30
आता नेमके हे मतदार कुठले, हे शोधण्याचे नवे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले

Municipal Corporation Election: कोल्हापूर शहरात १९ हजार मतदारांचा पत्ता सापडेना
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदार यादीतील घोळ संपता संपत नसताना आता शहरातील तब्बल १९ हजार २८४ मतदारांचा पत्ताच सापडत नसल्याची धक्कादायक माहिती समाेर आली आहे. आता नेमके हे मतदार कुठले, हे शोधण्याचे नवे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
महापालिका निवडणुकीसाठीची ४ लाख ९४ हजार ७११ इतके मतदार आहेत. यापैकी १९ हजार २८४ मतदारांचा घरचा पत्ता मिळत नाही. त्यामुळे हे मतदार या यादी आले कसे, असा सवाल उपस्थित होत आहे. आधीच महापालिकेच्या मतदार यादीत ३२ हजार २५० इतके दुबार मतदार असल्याचे सिद्ध झाल्याने आता आणखी एक नवा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यातच या १९ हजार मतदारांचा पत्ता मिळत नसल्याने हे मतदार आले कुठून, त्यांची नोंदणी कोणी केली, ते बोगस तर नाहीत ना? अशा एक ना अनेक शंका-कुशंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.
दुबार मतदारांचे आव्हान
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर यामध्ये जवळपास ३२ हजार २५० इतके दुबार मतदार असल्याचे समोर आले. यांची नावे पडताळून दुबार मतदारांची कोणत्याही एका ठिकाणाहून नावे कमी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
बदलीमुळेही पत्ते मिळण्यास अडचण
मतदारांच्या मतदान कार्डवरील घराचे पत्ते मिळत नसल्याने प्रशासनामध्येही संभ्रमावस्था आहे. हे मतदार बोगस आहेत की पूर्वी त्यांचे शहरात मतदान होते; पण आता हे कामासाठी, नोकरीच्या बदलीमुळे इतर शहरात गेले आहेत, याचा शोध घ्यावा लागणार आहे.