Kolhapur Municipal Election 2026: ४६ टक्के उमेदवार बारावी शिकलेले; सर्वात कमी वय, उच्चशिक्षित अन् साठीपार उमेदवार किती.. जाणून घ्या
By राजाराम लोंढे | Updated: January 12, 2026 13:56 IST2026-01-12T13:55:18+5:302026-01-12T13:56:08+5:30
कोल्हापूर महापालिकेच्या रणांगणात तब्बल ३२७ उमेदवार

Kolhapur Municipal Election 2026: ४६ टक्के उमेदवार बारावी शिकलेले; सर्वात कमी वय, उच्चशिक्षित अन् साठीपार उमेदवार किती.. जाणून घ्या
राजाराम लोंढे
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या रणांगणात तब्बल ३२७ उमेदवार असून, त्यांपैकी तब्बल १५१ उमेदवारांचे (४६ टक्के) शिक्षण बारावीपर्यंतच आहे. वयानुसार तुलना केल्यानंतर १३१ चाळिशीच्या आतील, तर ४१ ते ६० वयाचे १७२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मानसी लोळगे या सर्वांत कमी, २३ वर्षांच्या उच्चशिक्षित उमेदवार असून, तिसरी शिक्षण झालेले एक उमेदवारही महापालिकेसाठी नशीब अजमावत आहेत. त्याशिवाय तीन डॉक्टर, सहा इंजिनिअर, तर पाच वकीलही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
उमेदवारांनी निवडणूक कार्यालयाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांचे वय व शिक्षण किती, ही माहिती समोर आली आहे. कोणत्याही निवडणुकीत तरुणांचा सहभाग वाढत असला हे जरी खरे असले तरी कोल्हापूर महापालिकेसाठी ४० ते ६० वयोगटातील ज्येष्ठांची संख्या तुलनेत अधिक आहे. शिक्षणाचा विचार केल्यास इयत्ता तिसरीपासून ‘एम. एस्सी.’, ‘बी. एड.’, ‘एलएल. बी.’, ‘पीएच. डी.’, ‘एम. कॉम.’, ‘एम.बी.ए.,’ असे उच्चशिक्षितही उमेदवार पाहावयास मिळतात.
वाचा : कोल्हापूर, इचलकरंजीत बुधवारपासून तीन दिवस दारू विक्री बंद
उच्चशिक्षित महिलाही रिंगणात
महापालिकेच्या सर्वच प्रभागांत पदवीधर, पदव्युत्तर पदवी घेतलेल्या महिला उमेदवारांची संख्याही चांगली आहे. यामध्ये ‘बी. टेक.’, ‘बी.ए., एलएल.बी.’, ‘बी. एस्सी.,’ आदी शिक्षण असलेल्या महिलांचा समावेशही आहे.
साठीपार २४ उमेदवार!
वयाची ६० वर्षे पूर्ण केलेले २४ उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामध्ये सर्वांत ज्येष्ठ ६८ वर्षांचे माजी उपमहापौर प्रकाश पाटील, तर माजी नगरसेवक दिलीप पोवार हे ६७ वर्षांचे आहेत.
शिक्षण कमी असले तरी प्रशासनावर पकड
महापालिकेसाठी उमेदवारांपैकी ९५ उमेदवारांचे जेमतेम मॅट्रिकपर्यंत (१ ते १० वी) शिक्षण झालेले आहे. कमी शिक्षण असले म्हणून काय झाले? आतापर्यंत महापालिका प्रशासनात काम केलेल्या कमी शिक्षण असणाऱ्यांनी उठावदार काम करून दाखवले आहे. प्रशासन चालवण्याची नस माहिती असणे, एवढेच यातील महत्त्वाचे असते.
शिक्षणनिहाय उमेदवार असे :
- ३ ते १० वी - ९५
- ११ व १२ वी - ५६
- बी. कॉम. - ३०
- बी.ए. - २८
- डिप्लोमा - ११
- बी. एड. - ०९
- बी. एस्सी. - ०७
- इंजिनिअर - ०६
- वकील - ०५
- वैद्यकीय पदवी - ०३
- एम. एस्सी. - ०३
- एम. कॉम. - ०२.