Kolhapur Municipal Election 2026: महापालिकेच्या रिंगणात २२ पाटलांचे वॉर... दहा जागांवर दिसणार पोवार 'पॉवर'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 17:56 IST2026-01-09T17:54:23+5:302026-01-09T17:56:28+5:30
एकगठ्ठा मतदानाचे गणित

Kolhapur Municipal Election 2026: महापालिकेच्या रिंगणात २२ पाटलांचे वॉर... दहा जागांवर दिसणार पोवार 'पॉवर'
पोपट पवार
कोल्हापूर : भावकी, गावकीच्या राजकारणाने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असताना राजकीय संवेदनशील असणारे कोल्हापूरही त्याला अपवाद नसल्याचा प्रत्यय कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या उमेदवारांवरून येत आहे. महाविकास आघाडी, महायुतीसह वंचित बहुजन आघाडी, जनसुराज्य व अपक्ष असे ३२७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून यात तब्बल २२ पाटील आडनावाचे उमेदवार लढत आहेत.
दहा पोवार आडनावाच्या उमेदवारांनी मैदानात उडी घेतली असून, ९ साळोखेंनीही विविध ठिकाणी उमेदवारी करत प्रतिस्पर्ध्यासमोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे तीन-चार आडनावाच्या उमेदवारांभोवतीच महापालिकेची निवडणूक केंद्रस्थानी झाल्याचे चित्र आहे.
ज्याची भावकी जास्त त्याला प्राधान्य
गावकी-भावकी ही समाजाच्या संस्कृतीत खोलवर रुजलेली असते. आपलेपण जपणारी हीच भावकी आता राजकीय मतभेद आणि गटबाजीचे साधन बनली आहे. कुठल्याही पक्षाच्या उमेदवारापेक्षा गाव, समाज, भावकी, गावकी बनूनच मतदार मतदान करत असल्याने ज्याची भावकी जास्त त्यालाच उमेदवारी देण्याकडे सगळ्या पक्षांचा कल असतो. कोल्हापुरात उमेदवारी देताना भावकी-गावकी बनूनच अनेकांना उमेदवारी देण्यात आली आहे.
एकगठ्ठा मतदानाचे गणित
कोल्हापुरात पाटील, पोवार, साळोखे या आडनावांची संख्या पूर्वीपासूनच जास्त आहे. ठराविक भागात साळोखे, पोवार या आडनावांच्या मोठ्या गल्ल्या आहेत. यांची एकत्रित भावकी असल्याने एकगठ्ठा मतदान मिळेल हे गणित मांडत अनेक पक्षांनी याच आडनावाच्या उमेदवारांना रिंगणात उतरवले आहे. विशेष म्हणजे पोवार, पाटील, साळोखे हे एकमेकांचे सगेसोयरेही आहेत. त्यामुळे नात्यात एकाला उमेदवारी दिली तर पै-पाहुणे त्याच्यासाठी धावू शकतात हे ओळखूनच या आडनावांच्या उमेदवारांना अनेक पक्षांनी उमेदवारी दिली आहे.
कोणत्या आडनावाचे सर्वाधिक उमेदवार
- पाटील -२२
- कांबळे -११
- पोवार -१०
- साळोखे-९