Kolhapur: महाद्वार रोडवर १५ धोकादायक इमारती; विसर्जन मार्गाची प्रशासनाकडून पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 12:59 IST2025-09-04T12:58:30+5:302025-09-04T12:59:22+5:30
विसर्जन मार्गातील खड्डे बुजवा, अतिक्रमणे काढा

Kolhapur: महाद्वार रोडवर १५ धोकादायक इमारती; विसर्जन मार्गाची प्रशासनाकडून पाहणी
कोल्हापूर : महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी आणि पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी बुधवारी (दि. ३) सायंकाळी शहरातील पारंपरिक विसर्जन मार्ग आणि पर्यायी मार्गाची पाहणी केली. दोन्ही मार्गांवरील खड्डे बुजवून अतिक्रमण काढावे, अशा सूचना अधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. सुरक्षेसाठी मिरवणूक मार्गातील धोकादायक इमारतींसमोर बॅरिकेडिंग केले जाणार आहे.
सार्वजनिक गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक शनिवारी (दि. ६) सकाळी मिरजकर तिकटी येथून सुरू होणार आहे. बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेश, रंकाळा टॉवरमार्गे मिरवणूक क्रशर खणीकडे जाणार आहे. या पारंपरिक मार्गासह सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, हॉकी स्टेडियम, संभाजीनगर मार्गे क्रशर खणीकडे जाईल. पोलिस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलिस अधीक्षक धीरजकुमार बच्चू, महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी, शहर उपअधीक्षक प्रिया पाटील, करवीरचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्यासह शहरातील सर्व पोलिस निरीक्षकांनी मिरवणूक मार्गाची पाहणी केली.
वाचा- विसर्जन मिरवणुकीत पापाची तिकटीवरून महाद्वारवर प्रवेश नाही, सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह टेहळणी मनोरे
मार्गातील खड्डे बुजवण्यासह दुकानांचे अतिक्रमण हटवणे, रस्त्यात लटकलेल्या विद्युत तारा, केबल्स काढणे, अडथळे ठरणाऱ्या स्वागत कमानी काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिल्या. अधिकाऱ्यांनी क्रशर खणीचीही पाहणी केली. शहर अभियंता रमेश मस्कर, पोलिस उपअधीक्षक तानाजी सावंत, पोलिस निरीक्षक संजीव झाडे, श्रीराम कन्हेरकर, सुशांत चव्हाण, नंदकुमार मोरे, संतोष डोके यांच्यासह महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.
महाद्वार रोडवर सहा धोकादायक इमारती
महाद्वार रोडवर एकूण १५ धोकादायक इमारती होत्या. त्यापैकी नऊ इमारतींची दुरुस्ती केली आहे. उर्वरित सहा इमारतींचा धोका अजूनही आहे. या इमारतींसमोर कोणी थांबू नये यासाठी समोरच पत्रे मारून सूचना फलक लावले जाणार आहेत, अशी माहिती शहर अभियंता रमेश मस्कर यांनी दिली.
मिरवणूक मार्गात २६ स्वागत मंडप
पारंपरिक मिरवणूक मार्गात महापालिकेसह विविध राजकीय पक्ष आणि संघटनांचे २६ स्वागत मंडप असतील. मिरवणुकीतील वाहनांना मंडपांचा अडथळा होऊ नये यासाठी पोलिसांकडून त्यांना जागा निश्चित करून दिली जाणार आहे. अरुंद रस्त्यावर मंडपांना परवानगी मिळणार नाही. तसेच मंडपाच्या आकारावरही मर्यादा राहतील, असे पोलिसांनी सांगितले.
वाहतूक शिस्तीसाठी अधिकारी रस्त्यांवर
देखावे पाहण्यासाठी बुधवारी रात्रीपासून शहरात गर्दी वाढत आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत गर्दी राहणार आहे. या काळात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत रस्त्यांवर थांबून वाहतूक सुरळीत ठेवावी, अशी सूचना पोलिस अधीक्षकांनी दिली आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्याचा आदेश दिला आहे.
दोन दिवसांत खड्डे बुजतील?
मिरजकर तिकटीपासून पुढे संपूर्ण मिरवणूक मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. सर्व खड्डे बुजवण्याचे आदेश महापालिकेच्या प्रशासक आणि पोलिस अधीक्षकांनी प्रशासनाला दिले आहेत. मात्र, शुक्रवारी रात्रीपर्यंत सर्व खड्डे बुजवून रस्ते खड्डेमुक्त होणार काय? असा सवाल मंडळांकडून उपस्थित केला जात आहे.