तुम्ही विकला गेला नाहीत; पक्षाशी एकनिष्ठ राहिलात, तुमचे अभिनंदन! १६ जानेवारीला विजयाचा गुलाल उधळत शिवतीर्थावर या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 16:11 IST2026-01-09T16:10:18+5:302026-01-09T16:11:29+5:30
"दोन्ही पक्षांच्या उमेदवारांशी त्यांनी संवाद साधला. तुम्हाला शुभेच्छा आहेतच, पण त्याआधी तुमचे सर्वांचे अभिनंदन कारण तुम्ही विकले गेले नाहीत."

तुम्ही विकला गेला नाहीत; पक्षाशी एकनिष्ठ राहिलात, तुमचे अभिनंदन! १६ जानेवारीला विजयाचा गुलाल उधळत शिवतीर्थावर या
कल्याण : तुम्ही विकला गेला नाहीत. कुठल्याही आमिषाला बळी पडला नाहीत, पक्षाशी एकनिष्ठ राहिलात आता जोमाने लढा आणि १६ जानेवारीला विजयाचा गुलाल उधळत शिवतीर्थावर या अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे आणि उद्धवसेनेच्या उमेदवारांचे कौतुक करत मोलाचा सल्ला दिला. ठाकरेंनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी कल्याण डोंबिवली शहरांचा दौरा केला.
उमेदवारांशी साधला संवाद
यावेळी कल्याण पश्चिमेतील खडकपाडामधील साईचौक, बेतुरकरपाडा, मल्हारनगर, पूर्वेकडील तिसगाव नाका, डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडी, पश्चिमेकडील गणेशनगर चौक, गोपीनाथ चौक, पंडित दीनदयाळ रोड येथील मनसे आणि उद्धवसेेना युतीच्या निवडणूक प्रचार कार्यालयांचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांशी त्यांनी संवाद साधला. तुम्हाला शुभेच्छा आहेतच, पण त्याआधी तुमचे सर्वांचे अभिनंदन कारण तुम्ही विकले गेले नाहीत.
पदाधिकारी उपस्थित
तुम्हाला कशा पद्धतीने प्रलोभने दाखविली गेली ? अशी विचारणा केली. न विकले गेलेले उमेदवार कसे दिसतात हे पाहायला मी आलोय, अशी टिप्पणी ठाकरेंनी केली. डोंबिवलीतील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयालादेखील ठाकरेंनी भेट दिली. त्यांच्यासोबत मनसेचे नेते राजू पाटील, अविनाश जाधव, अनिल शिदोरे उपस्थित होते.
सभा घेणे टाळले
लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीत कल्याण डोंबिवलीत राज ठाकरे यांची एकतरी जाहीर सभा व्हायची. सभेसाठी परवानग्या घेतल्या होत्या. डोंबिवलीत काही उमेदवारांनी माघार घेतल्याने झालेल्या बिनविरोध निवडीमुळे ठाकरे नाराज असल्याने त्यांनी यंदा सभा घेणे टाळले, अशी चर्चा आहे. त्यांनी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला.