KDMC Budget 2022: केडीएमसीच्या तीन सीबीएसई शाळा; अर्थसंकल्पात तरतूद, मनपा शाळांमध्ये आता दहावीपर्यंत शिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 11:17 IST2022-03-05T11:16:19+5:302022-03-05T11:17:07+5:30
KDMC Budget 2022: या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, याकडेही लक्ष वेधण्यात आले.

KDMC Budget 2022: केडीएमसीच्या तीन सीबीएसई शाळा; अर्थसंकल्पात तरतूद, मनपा शाळांमध्ये आता दहावीपर्यंत शिक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : इंग्रजीचा जागतिक स्तरावरील प्रभाव लक्षात घेता, केडीएमसी क्षेत्रातील सर्वसामान्य पालकांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी सीबीएसई बोर्डाच्या तीन शाळा येत्या शैक्षणिक वर्षापासून केडीएमसी सुरू करणार आहे. केडीएमसीच्या शुक्रवारी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली. या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, याकडेही लक्ष वेधण्यात आले.
केडीएमसीच्या ५९ शाळांमध्ये साडेसात हजार विद्यार्थी शिकत आहेत. मनपाची एक शाळा इंग्रजी माध्यमाची होती, परंतु ती सध्या खासगी संस्थेला चालवायला दिली आहे. या पार्श्वभूमीवर सीबीएसई शाळा चालविणे मनपासमोर कसोटी असली, तरी हा सीबीएसई शाळा सुरू करण्याचा निर्णय सर्वसामान्य पालकांसाठी दिलासादायक आहे.
त्याचबरोबर, महापालिकेच्या शाळेमधील विद्यार्थ्यांना इयत्ता आठवीपर्यंतचे शिक्षण देण्याची सुविधा आहे. या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीपर्यंतचे सर्व शिक्षण सर्व सोईसुविधांसह मिळावे, याकरिता मनपातर्फे माध्यमिक शाळाही सुरू करण्याचे प्रस्तावित असल्याचे अर्थसंकल्पात नमूद केले आहे.
विद्यार्थ्यांमधील क्रीडा प्रतिभेचा घेणार शोध
मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांमधील क्रीडा प्रतिभेचा शोध घेऊन, त्याचा विकास करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अशा विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण, सर्व क्रीडा साहित्य, योग्य पोषण आहार, विविध ठिकाणच्या व्यावसायिक स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी प्रोत्साहन व आर्थिक मदत, तसेच प्रसंगी त्यांना राहण्याची सुविधा आदी सर्व बाबी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेतून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये महापालिकेचा विद्यार्थी नाव कमवेल, असा विश्वास सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.
इंग्रजी सुधारण्यासाठी उपाययोजना
मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषा सुधारावी, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. या अंतर्गत मनपा क्षेत्रातील खासगी इंग्रजी शाळांमधील शिक्षकांचे, तसेच तज्ज्ञ संस्थेच्या मदतीने विशेष इंग्लिश संभाषण प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे इंग्रजीवरील प्रभुत्व वाढेल, तसेच ते समाजात आत्मविश्वासाने वावरू शकतील, असे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.